मुंबई : उंचच उंच इमल्यांच्या मुंबईचं महाराष्ट्रासह अवघ्या देशाला मोठं आकर्षण असतं. मुंबई म्हणजे सगळ्या सुविधांचं माहेरघर, असा सगळ्यांचा समज असतो. पण त्याच मुंबईच्या नागरिकांसमोर यंदा पाण्याची समस्या खूपच गंभीर (Mumbai Water Crisis) बनलीय. मुंबईसाठीच्या धरणक्षेत्रावर वरुणराजा रुसल्यामुळं पाण्याचा साठा प्रचंड घटलाय. त्यामुळं मुंबईत आधीपासूनच 10 टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यात आता मुंबईकरांच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्याचा विचार सुरू झालाय. त्यामुळं मुंबईकरांसमोरची चिंता आणखी वाढलीय. पाहूयात ऐन पावसाळ्यात मुंबापुरीवर कशी लागू झालीय पाणीबाणी.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी मोठ्या प्रमाणात तळ गाठल्याने मुंबईवर पाणी कपात करण्याचा निर्णय 5 जून पासून घेण्यात आलाय. त्यामुळे मुंबई करांना पाणीटंचाईची समस्या सर्वत्र जाणवू लागली आहे. पाण्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.


आताच मुंबईतील पाण्याची भीषण परिस्थिती ही असताना एक धक्कादायक माहिती समोर येतेय. मुंबईला 30 दिवस पुरेल इतकाच म्हणजे केवळ 5.29 टक्के पाणी साठा आता धरणामध्ये आहे. 31 जुलैपर्यंत मुंबईकरांना पाणी पुरेल इतकंच पाणी सध्या सात धरणांपैकी काही धरणांमध्ये आहे. त्यामुळे पालिकेसमोर मोठी कसरत असणार आहे या पाण्याचे नियोजन करण्याचं. मात्र यावर मुंबई महापालिका आणि अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.


जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेने 30 मे पासून 5 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू केली गेली. तेव्हापासून मुंबई शहरात ठीक ठिकाणी पाण्याची टंचाई आणि पाण्याचा प्रेशर कमी असल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र महापालिकेकडून अधिकृत काही स्पष्ट होत नसल्याने विरोधक नाराज आहेत.


राखीव पाणीसाठ्यावर मदार असलेल्या मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांच्या पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा किंवा आणखी कपात करण्याची चर्चा करून काही निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या लागू असलेल्या दहा टक्के पाणीकपातीत आणखी वाढ न करता आधीच कपात लागू असल्याने अन्य पर्यायांचा विचार सुरु आहे असं अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली .


पाणी वापरावर निर्बंध म्हणजे नक्की काय होण्याची शक्यता?


- पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने केल्या या सूचना काटेकोरपणे पालन करण्यासाठी सूचना देण्यात येतील.
- शहरात सुरू असलेली बांधकामे, स्विमिंग टँक, वॉशिंग सेंटरवर होणारा पाण्याचा अपव्यय रोखला जाईल. 
- या कामांसाठी पाण्याचा वापर होत असल्यास त्यावर कारवाइ केली जाईल.
- घरकामे करताना पाण्याचे नळ सुरू ठेऊ नका असे आवाहन केले जाते. 
- भांड्यांमध्ये पाणी ओतून कामे करा.वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसा.
- घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसा.
- पाणी शिळे समजून फेकू नका.
- वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुवा.
- नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्या तोट्या योग्यरित्या बंद करा.
- उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे.अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.
- प्रकल्पना लागणारे पाणी हे सांडपाणी प्रक्रिया करून वापरावं लागेल.
- पाणी जपून वापरावे यासाठी महापालिकेने अगोदरच यातले काही आवाहनं केलेली आहेत. तर पुढे यातले काही निर्बंध लादले जाऊ शकतात.