Mumbai Vaccination Update : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. अशातच देशात 15 ते 18 वयोगटातील लोकांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. परंतु, काही लोक लसीकरणाबाबत अफवा पसरवताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतील घाटकोपर परिसरात. घाटकोपरमध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत होती. त्यावरुन अनेक गैरसमजही निर्माण झाले होते.
सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. मात्र गेले दोन दिवस समाज माध्यमात एका 15 वर्षीय मुलीचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे.
घाटकोपरच्या हिमालय सोसायटीमध्ये राहाणाऱ्या आर्या मांगे या 15 वर्षीय मुलीचा दिनांक 12 जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या अगोदर म्हणजे, दिनांक 7 जानेवारी रोजी या मुलीनं आपल्या भावंडांसह कोविड प्रतिबंधक लस घेतली होती. जेव्हा या मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिच्यावर दहावीच्या परीक्षेचं टेन्शन होतं. यातच तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि कुटुंबानं तात्काळ तिला रुग्णालयात नेलं. परंतु, रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र या घटनेला काही जणांनी लसीकरणाशी जोडलं आणि लसीकरणाने तिचा मृत्यू झाल्याच्या पोस्ट व्हायरल देखील केल्या. यामुळे तिचं कुटुंब मात्र त्रस्त झालं आहे. अशा पोस्ट व्हायरल करू नये अशी मागणी ते करीत आहेत.
समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असेलेल्या या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. पालक आणि विद्यार्थी हे देखील यामुळे संभ्रमात आहेत. यामुळे मुंबई महानगर पालिकेनं याची दखल घेतली आहे. स्वतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मुलीच्या कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी महापौरांनी तिच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून सविस्तर माहिती घेतली आणि त्यांचे सांत्वनही केलं. महापौरांनी यावेळी अशा प्रकारचे फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना असं करू नये म्हणून विनंती देखील केली.
एकीकडे प्रशासन मोठ्या प्रमाणत लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे काही जण अशा प्रकारे लसीकरणाबाबत चुकीचे समज पसरवीत असल्यानं अडचणीत आणखी वाढ होत आहे. त्यामुळे आता प्रशासन अशा लोकांना रोखण्यासाठी कडक कारवाई करणार का? हा प्रश्नही निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, 24 तासांत 21,474 रुग्णांची कोरोनावर मात
- Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे 178 महाविद्यालय प्राचार्यविना
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live