Mumbai Vaccination : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्यामुळे देशभरात लसीकरण मोहीमेनं वेग धरला आहे. परंतु, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही आजही लसीकरण बंद ठेवलं जात आहे. मंगळवार दिनांक 20 जुलै, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. तर काल (बुधवारी) मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद होत. अशातच आजही लसीकरण बंद असणार आहे. 



आज लसीकरण बंद असल्यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्वीटही करण्यात आलं. "मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की, 22 जुलै 2021 बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण लसीकरण केंद्राना आज केले जाणार आहे. लसीकरणाविषयी पुढील सूचना आम्ही देत राहू" , अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं सातत्यानं करण्यात येत आहे. 


जुलै महिन्याच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची ही चौथी वेळ आहे. महापालिकेला गेल्या आठवड्यातील शुक्रवारी लसींचा साठा मिळाला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झालं होतं. तसेच रविवारी आठवडा सुट्टी असल्यामुळे लसींचा उरलेला साठा सोमवारी आणि काही प्रमाणात मंगळवारी वापरण्यात आला. त्यानंतरचा साठा मंगळवारी येणं अपेक्षित होतं. मात्र तो साठा प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची नामुश्की मुंबई महापालिकेवर ओढवली. 


देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतं. हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणारा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम काही प्रमाणात मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 435 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 435 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,08,214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,020 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1097 दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ पाणी साचणे कायमचे बंद! मायक्रो-टनेलिंगचे काम पूर्ण