मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात सँडहर्स्ट रोड स्टेशन जवळ पाणी साचल्याने मध्य रेल्वे हमखास बंद पडायची. मात्र त्यावर अभियांत्रिकी कौशल्याने उपाय शोधून मध्य रेल्वेने सँडहर्स्ट रोड स्टेशन जवळ साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात साचणारे पावसाचे पाणी  रोखण्यासाठी या स्थानकाजवळील रेल्वे मार्गाखाली 415 मीटर लांबीच्या सर्वात लांब मायक्रो-टनेलिंगचे  काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून की काय या पावसाळ्यात अजूनही सँडहर्स्ट रोड स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे थांबली नाही. 


मध्य रेल्वे आणि मुंबई महानगर पालिकेने एकत्रितरीत्या या समस्येवर उपाय शोधला. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी सखल भाग असल्याने साचत होते त्या ठिकाणी एक मोठा खड्डा करून जमिनीखालून बोगद्याच्या सहाय्याने हे पाणी थेट समुद्रात टाकले जाते. या कामात मायक्रो टनेलिंगच्या सुलभतेसाठी 7 खड्डे तयार करण्यात आले. मध्य रेल्वे इंजिनीयरिंग विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने कामाची अंमलबजावणी करण्यात आली आणि अनेक आव्हाने असूनही 4 महिन्यांच्या कालावधीत हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. मध्य रेल्वेने या कामासाठी उर्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिले होते. उर्मी कन्स्ट्रक्शनने अतिशय जबाबदारीने आणि दिलेल्या वेळेत हे मोठे काम पूर्ण केले आहे. 


जमीनीखालील सूक्ष्म बोगद्याचे ( microtunnelling) निर्मितीसाठी आठ आरसीसी पीट लाईन आणि बृहन्मुंबई पालिकेचे स्टॉर्म वॉटर ड्रेनचे 1.5 मीटर व्यासाचे आरसीसी पाईप टाकण्यात आले.  यार्ड क्षेत्रात मायक्रो टनेलिंग मशीनसमोर रूळांचे तुकडे, दलदलीच्या मातीत वारंवार स्तर बदलणे, चिखलात अत्यंत कठीण खडक लागणे यासारखी आव्हाने होती. मात्र त्यावर यशस्वी रित्या मात करून हे काम पूर्ण झाले आहे. हे काम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मुंबई विभागाला 25 हजार रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे.


मध्य आणि पश्चिम रेल्वेची काही मोजकी स्थानके आहेत ज्यात दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे रेल्वे आणि मुंबई महापालिका मिळून मायक्रो टनेलिंगचे प्रकल्प उभे करते आहे. त्यापैकी सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकात मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर येणाऱ्या काळात, कुर्ला, सायन, वांद्रे, नालासोपारा, वसई या स्थानकात देखील असेच प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर मुंबई लोकल पावसात देखील थांबणार नाही असा दावा करण्यात येतोय.