मुंबई : गेल्या काही वर्षांपासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे. कारण मागील वर्षाच्या परीक्षेच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर 97 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 35 हजार म्हणजेच सुमारे 36 टक्के विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याची करामत विद्यापीठाने केली आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे.


गेल्या वर्षाचा निकाल आल्यानंतर सुमारे 97 हजार 313 विद्यार्थ्यांनी रिचेकिंसाठी अर्ज केला होता. हा आकडा विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आहे. तसंच हा आकडा विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास कमी झाल्याचंही दर्शवतो. 2014 ते 2016 या तीन वर्षांत विद्यापीठाच्या परीक्षेत सुमारे 73 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होत्या. यावरुन मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत.

मागील वर्षी पार पडलेल्या उन्हाळ्याच्या परीक्षेत 49, 596 विद्यार्थ्यांनी आपल्या 85,068 उत्तरपत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर शंका उपस्थित करत रिचेकिंगसाठी अर्ज केला होता. यामध्ये 16, 739 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होता. मात्र ही चूक लक्षात आल्यावर त्यांना उत्तीर्ण केलं.

तर 2017 च्या वार्षिक परीक्षेत सुमारे 47,717 विद्यार्थ्यांनी 76,086 उत्तरपत्रिकांच्या रिचेकिंगसाठी अर्ज दाखल केला होता. त्यात 18,254 विद्यार्थ्यांना चुकीचे गुण दिल्याचं समोर आलं होतं. तर 2016 च्या सहामाही परीक्षेत 44,441 पैकी नापास केलेले 16, 934 विद्यार्थी रिचेकिंगमध्ये पास झाल्याचं समोर आलं होतं.

2014 मध्ये सुमारे 82 हजार विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज दाखल केला होता, आता हा आकडा एक लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. "विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे," असं आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी सांगितलं आहे.

बऱ्याचदा विद्यार्थ्यांना रिचेकिंगचा निकाल उशिरा समजतो. त्यामुळे या काळात त्यांना फेरपरीक्षा देणं भाग पडतं. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्यानंतर रिचेकिंगचा निकाल जाहीर होतो. विद्यापीठ या परीक्षासाठी 500 रुपये फी आकारतं आणि उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी प्रत्येकी 100 रुपये घेतले जातात.