VIDEO हार्बर मार्गावर पुन्हा स्टंटबाजांचे माकडचाळे
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2018 10:46 AM (IST)
हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर एक अज्ञात तरुण माकडचाळे करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.
मुंबई: मध्य रेल्वे असो की पश्चिम रेल्वे अथवा हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर लोकलमध्ये माकडचाळे करणाऱ्यांनी हैदोस घातला आहे. हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर एक अज्ञात तरुण माकडचाळे करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. हा अज्ञात तरुण लोकलच्या दरवाज्याचा लोखंडी दांडा हाताने पकडून प्लॅटफॉर्मवर पाय घसरत असल्याचं दिसंतय. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्टंटबाजी जिवावर बेतू शकते हे माहित असूनही या घटनांना आळा बसत नसल्याने चिंता व्यक्त होतेय. काही दिवसांपूर्वी चुनाभट्टी ते जीटीबी नगर रेल्वे स्टेशन दरम्यानही अशीच स्टंटबाजी पाहायला मिळाली होती. या स्टंटबाजांनी स्टंटबाजी करतानाच एका प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला होता. त्यांची ही चोरी आणि संपूर्ण स्टंटबाजी त्यांनी स्वत:च शूट केली होती. इतकंच नाही तर त्यांनी आपलं हे कृत्य व्हिडीओच्या माध्यमातून पसरवलं होतं. त्यावेळी एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी या स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या.