Maharashtra Police Recruitment : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल सुरु आहेत.  मुंबई विद्यापीठात (Mumbai University) आज होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी अनेक उमेदवार मुंबई विद्यापीठाबाहेर आले होते. यावेळी सुरक्षेचं कारण देत विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांना गेटबाहेरच अडवलं. त्यामुळे उमेदवारांना विद्यापीठाच्या गेटबाहेरच मुक्काम करावा लागला आहे. 


विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जागा द्यावी यासाठी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने विद्यापीठाशी संपर्क साधला. मात्र विद्यापीठाने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सकाळी विद्यार्थ्यांच्या मैदानी परीक्षा आहेत मात्र विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये सोय केलेली नाही. कुठल्याही प्रकारची सोय न केल्याने विद्यार्थ्यांनी रात्र विद्यापीठाच्या गेट समोर, फुटपाथवर, पुलाखाली मुक्काम  काढली.  


आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे प्रवक्ते आनंदराज यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, सामान्यत: जेव्हा बीकेसीमध्ये मेळावा किंवा मीटिंग किंवा चित्रपटाचे शूटिंग असते तेव्हा पार्किंग सुविधा आणि मैदानाची सुविधा सर्वांना दिली जाते. मात्र विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांसाठी कोणतीही सोय केली नाही. विद्यापीठाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आज देशाचे भवितव्य रस्त्यावर झोपल्याचे पाहायला मिळाले आहे.


राहण्याची सोय आणि आरोग्य सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, पण...


दरम्यान, पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून उमेदवार मुंबईत दाखल होतात. परंतु सोयी सुविधांच्या अभावी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी मुंबईत पोलीस भरती (Mumbai Police Recuritment News) प्रक्रियेदरम्यान एका परीक्षार्थीचा मृत्यू झाला होता. मूळचा वाशिमचा रहिवाशी असलेला गणेश पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता. पोलीस भरतीची परीक्षा सुरू असतानाच त्याला अचानक भोवळ आली आणि तो मैदानातच कोसळला होता. त्यावेळी पोलिस भरतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. 


उमेदवाराच्या मृत्यूनंतर भरतीसाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीससेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरुण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरुन भरतीसाठी हे तरुण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत तरुणांची राहण्याची सोय तसेच आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्याचा निकाल पाच वर्षापासून ठेवला राखीव, कोश्यारींच्या पाठपुराव्यानंतरही मुंबई विद्यापीठाकडून दाद नाही