मुंबई : मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) एका विद्यार्थ्याचा निकाल पाच वर्षापासून राखीव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. निकाल राखीव ठेवल्याने  विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या पाठपुराव्यानंतरही मुंबई विद्यापीठाने दाद दिली नाही. विद्यापीठाने राज्यपालांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली आहे. 


प्रवीण गांधी महाविद्यालयात मॅनेजमेंट स्टडीचा (Management Study) अभ्यास करणारे दक्ष शहा या विद्यार्थ्याचा मागील पाच वर्षापासून निकाल मुंबई विद्यापीठाने राखीव ठेवला आहे. दक्षला वैद्यकीय कारणामुळे त्याच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी आवश्यक तासिका भरणे शक्य झालं नाही त्यामुळे त्याच्या पाचव्या सत्र परीक्षेस बसण्यास विद्यापीठाने परवानगी नाकारली होती. या विरोधात दक्ष मुंबई उच्च न्यायालयात गेला आणि त्याने यासंदर्भात याचिका दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याला परीक्षा देण्यास परवानगी दिली. त्याने पाचव्या सत्राची परीक्षा दिली, त्यानंतर सहाव्या सत्राची परीक्षा दिली. दोन्ही सत्रात तो पास झाला मात्र व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयामुळे त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला.


कोश्यारींच्या पाठपुराव्यानंतरही मुंबई विद्यापीठाकडून दाद नाही


दरम्यान संदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना फोन करून निकाल देण्याचं सांगितलं. मात्र या फोनला सुद्धा विद्यापीठांने दाद दिली नाही. यासंदर्भात विद्यापीठाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की,  परीक्षेला बसण्याआधी उपस्थितीची अट पूर्ण करणे गरजेचे असून व्यवस्थापन परिषदेने निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाला कळवण्यात आले आहे.  विद्यापीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 


मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित


मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दोन फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.  आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :