मुंबई :  मेट्रोच्या (Metro) कामामुळे मुंबईतील एका प्राचीन वृक्षाचा बळी गेला आहे. यावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ परिसरात असलेलं शेकडो वर्षापूर्वीचं 'बाओबाब' म्हणजेच गोरखचिंचेचं दुर्मिळ वृक्ष शनिवारी भुईसपाट करण्यात आलंय.

 मुंबईतील विकासकामांकरता आणखी एका दुर्मिळ आणि प्राचीन झाडाचा बळी गेलाय. सांताक्रुझ एसव्ही रोडवर गेल्या शेकडो वर्षांपासून उभं असलेलं गोरखचिंच जातीचं झाड भुईसपाट करण्यात आलंय. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर याचा निषेध केलाय. हे झाड तोडण्याचं कृत्य करणा-या अधिका-यांना आम्ही सत्तेत आल्यावर याची किंमत चुकवावी लागेल, असा धमकीवजा इशाराच ठाकरेंनी दिलाय. तर याला भाजपच्यावतीनं उत्तर देण्यात तत्पर असलेल्या आशिष शालेरांनीही आदित्य ठाकरेंना प्रतिसवाल केलाय. हे कमी होत की काय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर निशाणा साधलाय.

इतकं का विशेष आहे गोरखचिंचेचा वृक्ष?

  • आफ्रिका, ऑस्टेलिया या खंडांसह मादागास्कर बेटांवर प्रामुख्यानं हा वृक्ष आढळतो.
  • त्याची उंची 50 फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. याच्या खोडाचा परीघ 100 फुटांपर्यंतही असतो. 
  • याच्या खोडात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे हे झाड शेकडो वर्ष जगू शकतं.
  • काहीवेळा याची खोडे पोकळ झालेली आढळली आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्यावेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.
  • याची फुले रात्री फुलतात, त्यांना मंद सुवास असतो, म्हणून याला वेताळाचं झाड म्हणूनही संबोधलं जातं.

गोरखचिंचेचं हे झाड भारतातील काही दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे ते वाचवायलाच हवं होतं यात शंका नाही. पण मग साल 2021 मध्ये पालिकेच्याच वृक्ष प्राधिकरण समितीनं हे तोडण्याची मंजुरीच कशी दिली?, हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  पण राजकारण बाजूला ठेवलं तरी जागतिक स्तरावर प्राचीन वृक्षांच्या यादीत असलेल्या या 'वर्ल्ड ट्री' ला जगवणं ही प्रशासनाची जबाबदारी होती. रस्त्याच्या मधोमध जरी हे झाडं होतं तरी ते वाचवता आलं असतं का?,

 मग गेल्या तीन वर्षात हे शेकडो वर्ष जुनं, प्राचीन, दुर्मिळ, औषधी आणि जागतिक स्तरावर महत्त्वाचं गणलं गेलेलं झाल तोडून जर विकास साधला जात असेल तर खरंच विचार करण्याची गरज आहे. 

हे ही वाचा :

BMC : मुंबईत रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या 450 झाडांचा बळी?