मालाडमध्ये नो पार्किंग झोनमध्ये एक कार उभी करण्यात आली होती. कारमालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीनं ही कार टो करुन नेली.
विशेष म्हणजे, हा व्हिडीओ काढणारा युवक वाहतूक पोलिसांना कार ओढून नेऊ नका, अशी विनंती करत आहे. कारमध्ये एक महिला बाळाला दूध पाजत आहे, म्हणून किमान गाडी सावकाश ओढा, असंही ओरडून सांगत आहे. मात्र त्याचं काहीएक ऐकता वाहतूक पोलिस कार ओढून नेत होते.
इतकंच नाही, तर महिला दंड भरण्यास तयार आहे, असंही तो सांगत आहे. शशांक राणे असं वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचं नाव असल्याचं युवक बोलताना व्हिडिओत ऐकू येत आहे. या प्रकरणी ट्रॅफिक कॉन्स्टेबल शशांक राणेला निलंबित करण्यात आलं आहे.
नो पार्किंगमध्ये कार उभी असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. मात्र कार टो करुन नेताना महिलेला उतरवण्याचं भान पोलिसांनी ठेवायला हवं. किंबहुना कारला जॅमर लावूनही पोलिसांना कारवाई करता आली असती, मात्र त्यांनी आडमुठेपणा केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.