मुंबई : वांद्रे ते वरळी सि लिंक वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आजपासून वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल नाक्याच्या दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी छोट्या गाड्यांसाठी 70 रुपये टोल असणाऱ्या या टोलनाक्यावर आता 15 रुपये वाढ करून तो दर 85 रुपये करण्यात आला आहे. यासोबतच मालवाहतूक गाड्या मिनीबस यांच्यासाठी पूर्वी 110 रुपये असणारा टोल आता एकशे तीस रुपये करण्यात आलेला आहे. 


Pune-Satara Highway Toll Tax: कामाची बोंबाबोंब, वसुली मात्र जोरात! पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ


ट्रक आणि मोठ्या बस यांच्यासाठी 145 रुपयांवरून 175 रुपये टोल करण्यात आलेला आहे. एकंदरीतच साडे पाच किलोमीटर अंतर असणाऱ्या या सी लिंक वर प्रति किलोमीटर छोट्या गाड्यांसाठी पंधरा रुपये त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या गाड्या ज्यामध्ये ड्रायव्हर वगळून 12 प्रवासी प्रवास करू शकतात अशा गाड्यांना प्रति किलोमीटर 23 रुपये तर ट्रक आणि बस यांना प्रति किलोमीटर 31 रुपये मोजावे लागणार आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरामध्ये वाढ होत असतानाच आता दुसरीकडे टोल दरांमध्ये वाढ करून आणखी एक झटका सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून देण्यात आलेला आहे. 


पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरही टोलमध्ये पाच टक्के वाढ


गेली आठ वर्ष काम रखडलेल्या पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. या रस्त्याचे काम 31 मार्च 2013 ला पूर्ण केले जाईल असा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्त्याचे काम करणार्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमध्ये झाला होता. कालच याला आठ वर्ष पूर्ण झाली. मात्र अनेक ठिकाणी रखडलेले काम, अनेक ठिकाणी रस्त्याची सदोष बांधणी, सर्व्हिस रोड आणि इतर सुविधांच्या नावाने  बोंबाबोंब असताना या रस्त्यावर आजपासून  पाच टक्के टोल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.