मुंबई : अँटिलिया स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात एनआयएकडून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनआयए कित्येक दिवसांपासून एका ऑडी कारच्या शोधात होती आणि शेवटी त्या कारचा सुगावा एनआयएला लागला आहे. ही गाडी वसई भागात कुठेतरी असल्याची माहिती एनआयएला मिळाली, त्यानंतर एनआयएच्या पथकाने वसई आणि आसपासच्या भागात त्या गाडीचा शोध सुरू केला आहे.


एबीपी न्यूजला या प्रकरणाशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. ज्यामध्ये एनआयएच्या अटकेत असलेल्या विनायक शिंदेच्या माहितीनुसार सचिन वाझे  आणि तो एकत्र त्या कारमध्ये होते. सीसीटीव्ही फुटेज एवढं स्पष्ट नसलं तरी एजन्सीकडे बरेच फुटेज आहेत जे आता पाहिले जात आहेत. जेणेकरून विनायकने दिलेल्या माहितीची पुष्टी करता येईल.


विनायक शिंदे सचिन वाझेंच्या सांगण्यावरुन बार, पबमधून वसुली करायचा; NIA च्या सूत्रांची माहिती


मनसुख हिरण हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसला चौकशी दरम्यान हे फुटेज सापडले होते. ते आता एटीएसने एनआयएकडे सुपूर्द केले आहे. हे फुटेज वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलवरील असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी सांगितले की, हे फुटेज मनसुखच्या मृत्यूच्या आधीचे आहे. ज्यात विनायक शिंदे आणि सचिन वाझे  एकत्र दिसले होते.


मनसुख हिरण यांच्या हत्येच्या कट रचण्याच्या बैठकीला विनायक शिंदे आणि सचिन वाझे उपस्थित


मनसुखच्या हत्येचं प्लानिंग करण्यासाठी हे दोघे भेटले होते. मुंबईच्या उपनगरी भागात ते गेले होते, असंही तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या कारमध्ये विनायक शिंदे ड्रायव्हरच्या सीटवर आहे आणि सचिन वाझे त्याच्या शेजारील सीटवर बसले होते. ही गाडी एनआयएसाठी खूप महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या गुन्ह्यात ही गाडी कशी वापरली गेली हे अद्याप समजू शकलेलं नाही. 


एनआयएची टीम सचिन वाझे यांना घेऊन मिठी नदीजवळ; नंबर प्लेट, हार्ड डिस्क, डीव्हीआरसह महत्त्वाचे पुरावे हाती


आता एनआयए पुन्हा एकदा सर्व टोलनाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. यापूर्वी एटीएसने केलेल्या तपासणी अहवालात सचिन वाजे यांनी ऑडी कार वापरल्याचा उल्लेखही केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एनआयए वेगाने तपास करत असल्याचं दिसून येत आहे.