मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादीनं आतापर्यंत भेट झालीच नसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनीही भेटीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. 


एबीपी माझाशी बोलताना पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणून पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली.  या चर्चांमध्ये अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. ते म्हणाले की, भाजपला कोरोनाचे काही पडले नाही. काही झालं तरी आम्ही सत्तेत कसं यावं याकडे त्यांचं लक्ष आहे.


केंद्राच्या व्याजदर कपातीचा निर्णय 12 तासांत मागे घेतल्याबाबत ते म्हणाले की, एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो ,तो काही असाच होत नाही.  फाईलवर निर्णय झाला असणार. पाच राज्याच्या निवडणूक बघून त्या राज्यात फटका बसेल या भीतीने  हा निर्णय मागे घेतला.  या देशातील अर्थव्यवस्थेची अवस्था अशी केली आहे.  निर्णय चुकीचा आहे म्हणून त्या विरोधात बोललो, असं ते म्हणाले.


अमित शाह- शरद पवार भेटीच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, या वृतांत तथ्य नाही.  साखर उद्योगातील कॉन्फरन्ससाठी ते अहमदाबादला गेले होते.  अशा बातम्या उठवण्याचं काम भाजप सतत करत आहे.  आमची आघाडी तोडण्यासाठी भाजप हे करत आहे, असं ते म्हणाले.