मुंबई: चाळसंस्कृतीप्रमाणेच इराणी रेस्टॉरंटची शतकापूर्वीपासूनची परंपरा मुंबईतील गिरगावात जपली जातेय. त्याच गिरगावातलं एक इराणी रेस्टॉरंट आता अस्ताला गेलं. सनशाईन रेस्टॉरंट अँड बेकरीची (Sun Shine) इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत आल्याने हे रेस्टॉरंट आता बंद करण्यात आलं आहे. आज या रेस्टॉरंटचा शेवटचा दिवस होता, आणि शेवटचा दिवस कायम स्मरणात रहावा यासाठी अनेक ग्राहकांनी या ठिकाणी गर्दी केली.
गिरगावकरांचंच नव्हे तर इथून जाणा-येणाऱ्यांचा हक्काचा गप्पांचा अड्डा म्हणजे ठाकूरद्वार नाक्यावरील सनशाईन रेस्टॉरंट. अभिनेता राजेश खन्ना यांच्या मूळ वास्तव्यासमोरच हे रेस्टॉरंट. त्यांच्यासह अनेक मोठी मंडळी इथे आवर्जून उपस्थित राहायची असं जुने जाणते गिरगावकर सांगतात. इथल्या बन-मस्का, ब्रुन-मस्काची चव वर्षानुवर्षे जिभेवर तरळत राहणार आहे. पण आता हे आज रेस्टॉरंट बंद झालं.
राजेश खन्नाच्या अनेक आठवणी
ठाकूरद्वार नाक्यावरील सनशाईन रेस्टॉरंट अँड बेकरी गिरगावमध्ये आहे, पण तो सबंध मुबईकरांचा हक्काचा अड्डा होता. त्याला शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे. हे रेस्टॉरंट म्हणजे मुंबईच्या अनेक घटनांचं साक्षीदार. याची आणखी एक ओळख म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना ज्या घरामध्ये रहायचा त्याच्या बरोबर समोर हे हॉटेल. या ठिकाणी राजेश खन्नाच्या अनेक आठवणी आहेत.
आज हे रेस्टॉरंट बंद झालं. पण शेवटच्या दिवशी आपल्या आठवणींचा खजाना ताजा रहावा म्हणून अनेकजणांनी या रेस्टॉरंटला भेट दिली. शेवटच्या दिवशी या रेस्टॉरंटमध्ये तूफान गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. ज्यांनी आपल्या स्टगलिंगच्या काळात या ठिकाणी बसून गप्पा मारल्या, ज्यांनी या ठिकाणच्या बन मस्का आणि चहाचा आस्वाद घेताना गप्पांची मैफल रंगवली त्या सर्वांनी आज गर्दी केल्याचं दिसून आलं.
आज शेवटच्या दिवशी या हॉटेलकडून सर्व ग्राहकांचे आभार मानण्यात आलं. ग्राहकांनी दिलेले प्रेम आणि पाठिंब्यासाठी त्यांचे आम्ही आभारी आहोत असा एक बोर्ड या हॉटेलसमोर झळकत होता. एखाद्या वास्तूशी, एखाद्या रेस्टॉरंटशी घट्ट नातं निर्माण होणं आणि ते जपलं जाणं याचाच अनुभव या निमित्ताने आला. रेस्टॉरंट बंद झाल्याने मन भावूक होत असतानाच तिथे तयार होणाऱ्या पावाचा, केकचा दरवळ एखाद्या अत्तराप्रमाणे गिरगावकरांच्या मनात कायम राहील हे निश्चित.
ही बातमी वाचा: