Mumbai: मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. दुपारी चार वाजता पुलाच्या कामानंतर सीएसएमटी ते ठाणे लोकल धावायला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी कर्नाक आणि कोपरी पूल हटवण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. यातच आता कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालं आहे. मात्र हार्बर लाईनवरील काम सुरु असून रात्री 8 नंतर लोकल सेवा सुरु होणार आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाक पुलाचं पाडकाम शनिवारी रात्री 11 पासून सुरु झालं होत. 1868 मध्ये बनवण्यात आलेला हा पूल आता पाडण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती देताना सांगितले की, अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने 27 तासांच्या मेगाब्लॉकमध्ये 17 तासातच मेन लाईनची लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच हार्बर लाईनची लोकल सेवा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच रात्री 8 वाजता सुरु केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.   


यातच अप आणि डाउन धिम्या मार्गावर  आणि अप आणि डाउन जलद  मार्गावरील रेल्वे वाहतूक शेड्यूलपूर्वी पूर्ववत केली. पहिली लोकल ट्रेन 15.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाणेकरीता सुटली जी कर्नाक  ब्रिज डिस्मेंटलिंग साइट येथून 16.00 वाजता पास झाली.  हार्बर मार्गही  वेळापत्रकाच्या आधी 17.46 वाजता पूर्ववत करण्यात आला.  हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन पनवेल- वडाळा लोकल वडाळा येथून 17.46 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता रवाना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17.52 वाजता सुटली.






 


याचबद्दल बोलताना मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की "सर्व मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने हे एक मोठे आणि आव्हानात्मक काम होते. व्यापक तयारीचे काम, नाविन्यपूर्ण योजना, सूक्ष्म नियोजन आणि स्थानीय नागरी संस्थांशी योग्य समन्वय यामुळे आम्हाला हे प्रचंड काम नियोजित वेळेआधी पूर्ण करता आले. अनेक मोठ्या क्षमतेच्या क्रेन आणि इतर यंत्रसामुग्रीच्या तैनातीमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि टीम वर्कमुळे हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात मदत झाली. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकचा उपयोग मोठ्या प्रमाणात इतर कामांसाठी देखील करण्यात आला.  ट्रॅक, ओएचई आणि शॅडो ब्लॉकमधील सिग्नलिंगची देखभाल, ज्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे 900 तासांची बचत झाली.''


दरम्यान, सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम करण्यासाठी तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यासाठी मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहे.