मुंबई : प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला, तो नाकारला, समता बंधूभाव आणि एकमेकांवर आपुलकी निर्माण  कशी होईल यावर लिखान केलं. आताच्या काळात धर्माचं भांडण सुरू झालेलं नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं भांडण सुरु आहे असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. राजकीय पक्ष म्हणून आम्ही भुमिका घेऊ, मात्र मतदारांनी काय पाहिजे हे ठरवलं पाहिजे. इथल्या प्रत्येक माणसाने लोकशाही पाहीजे की हुकुमशाही हे ठरवलं पाहीजे असंही ते म्हणाले. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.


दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हे लोकार्पण होतंय. त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये, आपण मनूच्या कायद्यामध्ये अडकून पडणार आहोत की नवं काही घडवणार आहोत याचा विचार केला पाहिजे. एका बाजूला वैदिक परंपरा आणि दुसरी संतांची परंपरा उभी आहे. एका बाजूला विवाह आणि दुसऱ्या बाजूला पुनर्विवाह असा भाग आहे. वैदिक धर्म म्हणजे विधवांचं मुंडण करणारा तर संत परंपरा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह करणारा, त्यामुळे लोकांनी काय निवडायचं ते ठरवावं. प्रबोधनकारांचा इतिहास बारकाईने केला असता त्यांनी वैदिक परंपरेवर आसूड ओढला आहे. उद्याच्या भवितव्याचा विचार करायचा असता हा धर्म सार्वजनिक कसा होईल याचा विचार केला. 


प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. धर्म आवश्यक आहे, पण त्याच्या अधिन जाऊ नये असा त्यांचा समज होता. त्याचं धर्माशी भांडण नव्हतं, तर सामाजिक व्यवस्थेशी भांडण होतं. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केला. आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला म्हणून राष्ट्र म्हणून उभं राहू शकलो नाही. प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला. तो नाकारला. समता बंधूभाव आणि एकमेकांबद्दल आपुलकी कशी निर्माण होईल यावर लिखान केलं. माणसं एकत्र येतात ती भाषा आणि संस्कृतीवर. याबद्दलच जर आपुलकी नसेल तर ती एकत्र येणार नाहीत. आता धर्मावर आधारित विचारसरणी पुढे नेण्यात अर्थ नाही. 


जात नावाची व्यवस्था हा एक देश बनला आहे असं सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उत्तर भारतामध्ये काप म्हणजे जात पंचायत. देशात आता या काप पंचायतीचा पुरस्कार करण्याचा विचार पुढे येतोय. मग आपण नेमकं कुणाला पुढे नेतोय. आपण इतर धर्मामध्ये लोकशाही नाही असं म्हणतोय पण वैदिक धर्मात हुकूमशाहीच आहे. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "जो वारीला जातोय त्याच्यामध्ये ही भेदाभेदीची संस्कृती येणार नाही, कारण सर्वजण समान आहेत अशी त्यामागे भावना आहे. समाजव्यवस्थेमध्ये असलेलं बंड म्हणजे 700 वर्षांपूर्वी सुरू झालेली वारी. चांगल्या भाषेमध्ये मांडणी करायचं म्हटलं तर वैदिक धर्म म्हणजे विधवेचं मुंडण करणारा धर्म तर संताचा धर्म म्हणजे तिचा पुनर्विवाह होय. यापैकी योग्य तो एक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आता वैदिक धर्म की वारकरी धर्म निवडण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेमध्ये नाही. त्याला बंदिस्त करता येत नाही. पीढी बदलत जाते तसा विचार बदलतोय, तसा या शब्दाचा अर्थ बदलतोय. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे पण राज्याला धर्म राहिलेला नाही, तो बारकाईने लक्षात घेतला पाहिजे."