मुंबई: मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात काल युरोलॉजी आणि जनरल अशा मिळून तब्बल 30 ते 40 शस्त्रक्रिया रखडल्या. धुतलेले कपडे वेळेवर न मिळल्यानं या शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


महापालिकेच्या प्रभादेवी येथील सेंट्रल लाँड्रीमध्ये मनुष्यबळाच्या अभावी कपडे धुऊन रुग्णालयाला न मिळाल्याने हा प्रकार घडला आहे.

सायन रुग्णालयातील 50 टक्के कपडे खासगी लाँड्रीमध्ये आणि 50 टक्के कपडे सेंट्रल लाँड्रीमध्ये धुवायला नेले जात. मात्र जून 2017 मध्ये खासगी लाँड्रीचे कंत्राट संपल्याने सर्व कपडे पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीत धुण्यास जाऊ लागले.

पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीमध्ये 83 कर्मचारी दिवसाला 16 हजार कपडे धुऊ शकतील इतकी क्षमता आहे. मात्र सध्या या लाँड्रीमध्ये केवळ 45 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचे ओझे येत आहे.शिवाय अनंत चतुर्थीमुळे पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीमध्ये मनुष्यबळ कमी असल्यानं काल कपडे मिळाले नाहीत आणि शस्त्रक्रिया थांबविण्याची वेळ आली. दुपारनंतर हे कपडे रुग्णलयात आल्याने नवे वेळापत्रक आता तयार केले आहे.