मुंबई : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो-3च्या कामाला आता वेगानं सुरुवात होणार आहे. मेट्रो-3च्या पॅकेज 7 मधील भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण असून, मेट्रो तीनसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं.
भुयार खोदणारं वैनगंगा-1 नावाचं टनेल बोअरिंग मशिन चालवून दाखवण्यात आलं. भुयारी करणाच्या या कामात आज 1.26 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यात आला. वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिननं 259 दिवसांत हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. 33.5 किमीची मेट्रो-3 ही देशातील पहिली भुयारी मेट्रो असणार आहे.
मुंबईतील कुलाबा-बांद्रा-सिप्झ या मेट्रो-3नं आपल्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. मरोळ पाली ग्राऊंड ते इंटरनँशनल एअरपोर्ट या मार्गावर भुयारीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा आज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.
वैनगंगा-1 टनेल बोअरिंग मशिनची माहिती
- वैनगंगा-1 हे 92 मीटर लांबीचं टनेल बोअरिंग मशीन शांघाय टनेलींग इंजीनिअरींग कंपनीनं तयार केलं आहे.
- वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिनने 8 जानेवारी 2018 रोजी मरोळच्या पाली ग्राऊंड येथे भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात केली.
- छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंतचा 1.26 किमीचं भुयाराचा पहिला टप्पा 259 दिवसांत पार केला.
- मुंबई शहराचा भूगर्भ बेसॉल्ट, ब्रेशिया, टूफ अशा प्रकारच्या कठीण खडकांचा आहे. त्यांना भेदत भुयारीकरण करुन वैनगंगा-1 नं आपली कामगीरी फत्ते केली.
- वैनगंगा-1नं सध्या कार्यरत असणाऱ्या मेट्रो लाईन-1 आणि सहार उन्नत मार्ग यांसारख्या महत्वाच्या ठिकाणांखालून भुयारीकरण केलं.
मुंबई मेट्रो- 3 टप्पा
- कुलाबा-वांद्रे-सिप्झ या 33.5 किमीच्या देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचे काम सध्या मुंबईत सुरु आहे.
- आतापर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं प्रकल्पातील सुमारे 9 किमीचं काम पूर्ण केलं आहे.
- मुंबईत सध्या 17 भुयारीकरण यंत्रे 10 वेगवेगळ्या ठिकाणी भूगर्भात उतरवण्यात आली आहेत. 14 यंत्रांद्वारे भुयारीकरणाचं काम सुरु झालं आहे.