मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच आरोपींची न्यायालयीन कोठडीही कोर्टाने 14 दिवसांनी वाढवली आहे. जामीन फेटाळल्याचं समजतात अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना अश्रू अनावर झाले.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जाला राज्य सरकारकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यात असल्यानं सद्य परिस्थितीत आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
"जर आरोपी या महिला डॉक्टर आहेत, आणि या प्रकरणामुळे जर त्यांचं करियर पणाला लागत असेल, तर दुसरीकडे आत्महत्या करणारी महिलादेखील एक डॉक्टरच होती. तिनेही यात आपला जीव गमावला आहे, हे विसरून चालणार नाही", असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात केला होता. तसेच अजामिनपात्र गुन्ह्यात आरोपी आपल्या मूलभूत अधिकारांविषयी बोलू शकत नाहीत, असंही ते पुढे म्हणाले.
डॉ. पायल तडवीने नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. त्यामुळे पोलिसांनी नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे.
आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
आणखी वाचा
- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी 21 जूनपर्यंत वाढवली
- पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींची कस्टडी क्राईम ब्रांचला देण्यास हायकोर्टाचा नकार
- डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज
- Dr.Payal Death Case | पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनही आरोपींना अखेर बेड्या
- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल