मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील राणीच्या बागेत (Rani Bagh) रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. फक्त आज दिवसभरातील तिकीटाच्या विक्रीतून 13.78 लाख रूपयांची कमाई झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


नववर्षाची सुरुवात आणि पहिल्याच दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईच्या राणीच्या बागेत पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. आतापर्यंतची ही रेकॉर्डब्रेक गर्दी असून नव्या वर्षाच्या सुट्टीच्या पहिल्याच दिवशी एकाच दिवसात 32,820 लोकांनी या बागेत हजेरी लावली असून यातून एकाच दिवसात 13.78 लाखांची कमाई झाली आहे. 


कोरोना नंतरची राणीच्या बागेत एकाच दिवसात झालेली सर्वाधिक पर्यटकांची ही गर्दी आहे. एका दिवसात पर्यटकांच्या या गर्दीमुळे रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. हजारो पर्यटक एकाच दिवशी आल्याने सायंकाळी पावणे पाच वाजता आम्हाला तिकीट विक्री बंद करावी लागली, त्यामुळे अनेक पर्यटकांना पावणे पाच नंतर राणीच्या बागेत घेता आले नाही, त्यामुळे अनेक पर्यटक परत गेले. आज राणीच्या बागेत जाण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने तिकीट खरेदी केलेल्या पर्यटकांची संख्या 27,262 तर ऑनलाइन पर्यटकांनी तिकीट काढलेल्यांची संख्या  5,558 इतकी होती. पर्यटकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकाच दिवसात 13,78,725 रुपयांची कमाई मुंबई महापालिकेला झाली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. 


पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 6 नोव्हेंबर रोजी 31,841 पर्यटकांनी रानीच्या बागेत हजेरी लावली होती. यातून 11.12  लाख रुपये कमाई झाली होती. मात्र, कोरोनानंतर उद्याने सुरू झाल्यानंतरची ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि कमाई आहे. याआधी सुद्धा गणेशोत्सवाच्या काळात, दिवाळीच्या सुट्ट्यात आणि ख्रिसमसमध्ये अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळाली होती.


मुंबईतील आणि मुंबई बाहेरचे पर्यटक नेहमीच सुट्टीच्या दिवशी राणीच्या बागेत भेट देण्याला प्राधान्य देतात. राणीच्या बागेत नवनवीन प्राणी त्यासोबतच पेंग्विन पाहण्यासाठी बच्चे कंपनी उत्साही असते. त्यामुळे सुट्टीचा दिवस घालण्यासाठी खास मुंबईकर राणीच्या बागेत सहकुटुंब येत असतात.  


लहान मुलांसाठी पर्वणी


मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्या यादीत 'राणीची बाग' प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच भायखळा येथे आहे. ही पर्यटकांचं खास आकर्षण आहे. या बागेत विविध प्रकारची पुरातन झाडे, वेगवेगळे प्राणी, पक्षी, कासवे , साप, असे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत. या बागेत येणं म्हणजे लहान मुलांसाठी मोठी पर्वणीच असते. विषेश हे की, मुंबईच्या वातावरणात या बागेत पेंग्विन्सही पहायला मिळतात. 


महत्वाच्या बातम्या


मुंबई आयआयटीतील मुलीचा पोलिसाकडून विनयभंग, नवी मुंबईतील पाम बीचवरील धक्कादायक घटना