Mumbai Police Drink and Drive:  नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या 156 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह (Drink And Drive) करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. 


नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, रेस्टोरंट्स, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. अनेक ठिकाणचे मार्ग बदलण्यात आले. तर काही ठिकाणे 'नो पार्किंग झोन' तयार करण्यात आले. 


रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा याआधीदेखील मुंबई पोलिसांनी दिला होता. वाहतूक पोलिसांनी पुन्हा ब्रेथ ॲनालायझर तपासणी सुरू करत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, मुंबईत 156 जणांवर मद्य प्राशन करून वाहन चालवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. तर, अतिवेगात वाहने चालविणाऱ्या 66 जणांवर कारवाई करण्यात आली. 


मागील वर्षी  कोरोना महासाथीच्या संकटामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठीच्या सेलिब्रेशनसाठी निर्बंध होते. त्यामुळे मागील वर्षी ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हची फार कमी प्रकरणे आढळली होती. 


सोशल मीडियावर मुंबई पोलिसांची कल्पक मोहीम


ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर कल्पक मोहीम राबवली. वेगवेगळ्या पोस्ट, ट्वीटच्या माध्यमातून पोलिसांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नका, असे आवाहन केले.