मुंबई : मलबार हिल परिसरात असणारा सर्वात टुमदार बंगला म्हणजे रामटेक बंगला. मंत्र्यांइतकाच सतत चर्चेत राहणारा आणि बातम्यांमध्ये झळकणारा हा बंगला. देवगिरी बंगला आणि सागर बंगला यांच्या बरोबर मध्ये असणारा आणि विशेष म्हणजे या दोन्हीपासून 'समान अंतर' राखून असणारा हा बंगला. मलबार हिल परिसरातला सी-फेसिंग असणारा हा बंगला कुणालाही हवाहवासा वाटेल असाच. पण सध्या हा बंगला मंत्र्यांना नकोसा वाटू लागल्याची चर्चा आहे.


नुकत्याच जाहीर झालेल्या बंगले वाटपात हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालाय. पण बावनकुळेंना रामटेकवर मुक्काम हलवण्यात राम वाटत नसल्याची चर्चा आहे. या बंगल्यात राहायला जावं की नाही, असा प्रश्न त्यांना पडल्याची माहिती आहे. आता हा प्रश्न पडण्यामागेही काही कारणं आहेत. पूर्वीच्या मंत्र्यांना आलेले अनुभव आणि शकुन-अपशकुन याबाबतचे समज यांच्या मिश्रणातून या बंगल्याची एक वेगळीच गोष्ट समोर येतेय. 


रामटेक बंगल्याचं गेल्या काही वर्षातलं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जे जे मंत्री रामटेकवर राहिले, ते कुठल्या ना कुठल्या राजकीय संकटात अडकताना दिसले.


Ramtek Bungalow History : रामटेक बंगल्याच्या इतिहास


विलासराव देशमुख 


सन 1995 ला रामटेकमध्ये विलासराव देशमुख वास्तव्यास असतानाच त्यांचा मोठा पराभव झाला.


छगन भुजबळ 


आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला. त्यानंतर तेलगी प्रकरणात भुजबळांचं नाव समोर आलं. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.


एकनाथ खडसे


युती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनंतरचे वजनदार मंत्री म्हणून एकनाथ खडसेंना हा बंगला मिळाला. त्याच वर्षी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना बंगल्यासोबतच मंत्रिपदावरही पाणी सोडावं लागलं. 


दिपक केसरकर 


शिंदे सरकारमध्ये केसरकरांना हा बंगला मिळाला होता. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून केसरकरांना डच्चू मिळाला. 


रामटेक हा बंगला आता पंकजा मुंडेंना दिला जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. या चर्चेमागेही एक राजकीय इतिहास आहे. 1978 साली याच बंगल्यावर वास्तव्य असताना शरद पवारांनी वसंतदादा सरकार पाडून पुलोद सरकारची स्थापना केली होती. पवारांनी दिलेल्या या राजकीय धक्क्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळेच गोपीनाथ मुंडेंनी हा बंगला पवारांकडून मागून घेतला होता. एकेकाळी आपल्या वडिलांचं वास्तव्य या बंगल्यात असल्यामुळं पंकजा मुंडेंचंही या बंगल्याशी भावनिक नातं आहे. 


दरम्यान, बावनकुळेंचं कुटुंब या बंगल्याची पाहणी करून गेल्याचीही चर्चा आहे. आता रंगरंगोटी आणि डागडुजीनंतर रामटेक बंगला पुन्हा नव्याने सज्ज होईल. मात्र तिथे राहण्यासाठी कोण सज्ज होणार, याची उत्सुकता मात्र ताणली गेलीय.