मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना 26 जुलै 2005 ची आठवण झाली. मंगळवारी, म्हणजेच 29 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर अनेकांना '26 जुलै' होण्याची भीती वाटली. मात्र दोन्ही दिवसांच्या पावसाची तुलना करता यंदाचा पाऊस सुसह्य होता, असंच म्हणावं लागेल.

29 ऑगस्ट 2017 ला 12 तासांच्या कालावधीत 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. ही आकडेवारी 11
दिवसांच्या सरासरी पावसापेक्षा अधिक आहे. फक्त मुंबईच नाही, तर इतर शहरांमध्येही थोड्याफार प्रमाणात हेच चित्र आहे. पर्जन्यमानाचे बदलते प्रमाण आणि काँक्रिटायझेशनमुळे हे घडल्याचं विविध संशोधनातून समोर आलं आहे.

30 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता सांताक्रुझमध्ये गेल्या 24 तासात 304 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरीत 297 मिमी, तर वरळीत 289 मिमी पाऊस झाला. बोरीवलीत 211 मिमी, तर भायखळ्यात 227 मिमी पाऊस पडल्याची आकडेवारी महापालिकेने दिली आहे.

26 जुलै 2005 नंतर 24 तासात सर्वाधिक पाऊस होण्याची दुसऱ्या क्रमांकाची घटना म्हटली जात आहे. 26 जुलै
2005 रोजी सकाळी 8.30 ते 27 जुलै 2005 रोजी सकाळी 8.30 या वेळेत मुंबईत 944 मिमी पाऊस झाला होता. यामध्ये जवळपास 1094 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

26 जुलै 2005 च्या पावसाचे आफ्टरइफेक्ट्सही पाहायला मिळाले. साचलेल्या पाण्यात कचरा किंवा प्राणी-पक्ष्यांचे मृतदेह कुजून घाणीचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे रोगराई वाढली.

दोन्ही घटनांमध्ये फरक काय?

26 जुलै 2005 रोजी झालेला पाऊस ही ढगफुटी होती, मात्र 29 ऑगस्ट 2017 रोजी ढगफुटी झालेली नाही, हा दोन्ही दिवसातला सर्वात मोठा फरक आहे.

26 जुलै रोजी सातत्याने पाऊस कोसळत होता. मुंबईसह सर्वच परिसरात पावसाने जोर धरला होता. 29 ऑगस्ट रोजी मात्र संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर पावसाची रिमझिम सुरु होती. तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं.

दोन्ही घटनांमध्ये साम्य काय?

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017 या दोन्ही दिवशी अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेकांच्या गाड्या रस्त्यात बंद पडल्या, तर काहींनी भररस्त्यात गाड्या सोडून चालत घर गाठणं पसंत केलं.

पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गावरील लोकल वाहतूक ठप्प. अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं.
दोन्ही वेळा मुंबई स्पिरीट पाहायला मिळालं. अनेकांच्या सुटकेसाठी मदतीचे हात सरसावले. जात, धर्म, पंथ या पलिकडे जात मुंबईकर या भावनेने पावसात अडकलेल्यांच्या मदतीला अनेक जण धावले.

काही जणांनी फक्त ओळखीच्याच नाही, तर गरजूंनाही आपल्या घरी पावसात आसरा दिला. अनेक सेवाभावी संस्थांनी पावसात अडकलेल्या नागरिकांसाठी चहा, पाणी, बिस्किटं, नाश्ता, जेवण यांची सोय केली.