Mumbai Rains Hindmata : मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीदेखील झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला दरवर्षी पावसात तलावाचं स्वरुप घेणाऱ्या हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलंच नाही. या भागात पाणी न साचल्याने स्थानिकांना सुखद धक्का बसला आहे. त्याशिवाय या ठिकाणाहून होणारी वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत हिंदमाता परिसरात पाणी साचलं नव्हते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरती असून मुसळधार पाऊस झाल्यास पाणी साचण्याची शक्यता आहे.
पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न करण्यात आले होते. हिंदमातामध्ये आज सकाळी पाणी न साचल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही. मुंबई महापालिकेनेदेखील भागातील व्हिडिओ ट्विट केला आहे.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परळ, दादर भागात मोठा पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली. मात्र, महापालिका कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत काही तासांतच रेकॅार्डब्रेक पाऊस पडत आहे. मुंबई शहर भागात 95-98 मिमी, उपनगरात 115-124 मिमी पाऊस पडला आहे. हिंदमाता, दादर गांधीनगर अशा सखल भागात मुंबई महापालिकेने भूमिगत टाक्या बनवल्या. त्याचा फायदा झाला आहे. मागील वर्षी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचे हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेने कशी साधली किमया?
भौगोलिक रचनेमुळे हा हिंदमाता परिसर सखल भागात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी लवकरच साचते. त्यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी महापालिकेकडून सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची क्षमता 2.87 कोटी लिटर इतकी आहे. पपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकीमुळे पाण्याचा निचरा लवकर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. यंदाच्या पावसात भूमिगत टाक्यांचा फायदा दिसून आला असल्याचे चित्र आहे.