Shivsena MP Sanjay Raut on CM Eknath Shinde : कालपर्यंत शिंदे गटासाठी रडणारे अनेकजण अचनाक शिंदे गटात सामील झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut0 यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे अधिकृत व्हिप हा केवळ शिंदे गटाचा लागू होतो. इतर फुटीर लोकांचा लागू होत नाही, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला लगावला आहे. त्यासोबतच नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. निवडणुका होऊन जाऊ द्यात, आम्ही तयार आहोत, असं आव्हानही संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपला दिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "शिंदे गटातील आमदारांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्व आमदारांना केवळ पैसे नाही मिळालेत, त्यांना आणखीही खूप काही मिळालंय. पण आता नवं सरकार महाराष्ट्रात उपस्थित झालं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी काम केलं पाहिजे."
उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती असणाऱ्या चार लोकांमुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली आहे, असा आरोप गुलाबराव पाटलांनी विधानसभेत बोलताना केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ती जी चार लोकं ते म्हणतायत. ते सतत पक्षाचं काम करत होते. आजही पक्षाचंच काम करत आहेत. अडीच वर्ष का होईना तुम्ही सत्तेत होतात, तेव्हाही हे चार लोकं, ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, ते आजही पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे दूधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. ठिक आहे तुम्ही जा, बहाणे सांगू नका."
व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता इतर 14 आमदारांवर कारवाई करा, अशा आशयाचं पत्र शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्या 14 आमदारांना नोटीस पाठवलीये. ते बाळासाहेब ठाकरेंचेचं शिवसैनिक आहेत." पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव जिंकतात, त्यावेळी त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. त्यांनी राज्याची भूमिका न मांडता, त्यांनी पक्षाविरोधात बंड का केलं? यावर खुलासे दिले. नारायण राणेंचं भाषणही याच प्रकारचं होतं. छगन भुजबळांचं भाषणंही असचं होतं. पक्ष सोडणारा किंवा पक्षाशी प्रतारणा करणारा नेता ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी त्याला खुलासेच द्यावे लागतात."