Mumbai Rains Updates: सोमवार रात्रीपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही तासांपासून कोसळत असलेल्या पावसांमुळे मुंबईतील (Mumbai) विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर, लोकल रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.  


धारावी कलानगर रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. गोरेगाव ते गुंदवली या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी आहे. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. कुर्ला हायवे जंक्शन रस्ता, चेंबूर स्टेशन परिसर, चेंबूर सब वे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे. रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. 


हिंदमाताजवळील वाहतूक सुरळीत


पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत (Mumbai) पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न  करण्यात आले होते. हिंदमातामध्ये आज सकाळी पाणी न साचल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई (Mumbai Rains) महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही. 






 


घाटकोपरमध्ये घरावर दरड कोसळली, जीवितहानी नाही


घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरात पाचजण होते. दरडीच्या भागासह एक झाड घरावर कोसळले. या घटनेनंतर घरातले संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. घराचे मोठे नुकसान झाले आहे.


बेस्टच्या वाहतूक मार्गात बदल 


पावसामुळे पाणी साचल्याने बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. बस क्रमांक 357, 360, 355 (मर्यादित) या बसेस चेंबूर शेल कॉलनी येथून डॉ. आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत. तर, सायन रोड क्रमांक 24 येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. 


मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rains)


मुंबई (Mumbai Rains) शहर व उपनगरात मध्यम  ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज सायंकाळी 4.10 वाजता भरती येणार असून  4.01 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर, रात्री 10.21 वाजता ओहोटी येणार आहे.