Mumbai Rains : मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने मुंबईकरांसाठी चांगली बातमी दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव भरून वाहू लागला आहे. आज दुपारी एक वाजून चार मिनिटांच्या आसपास हा तलाव भरून वाहू लागला. मोडक-सागर हा ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला आहे. 


मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा सात तलावांमधून केला जातो. मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच सन 2021 मध्ये 22 जुलै 2021 रोजी मध्यरात्री 3.24  वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच सन 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.24 वाजता, वर्ष 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन 2018 आणि 2017 असे दोन्ही वर्ष हा तलाव 15 जुलै रोजी आणि सन 2016 मध्ये एक ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव यापूर्वीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला असल्याची माहिती जल अभियंता खात्याच्यावतीने देण्यात आली.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे सहा वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 81152 .20 कोटी लीटर (8,11,522 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 56.07 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. 


कोणत्या तलावात किती पाणीसाठा?


अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 43.72 टक्के अर्थात 9926.80 कोटी लीटर (99,268 दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.79 टक्के अर्थात 9689.40 कोटी लीटर (96,894 दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 53.90 टक्के अर्थात 10432.20 कोटी लीटर (1,04,322 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.06 टक्के अर्थात 36611.30 कोटी लीटर (3,66,113 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 53.18 टक्के अर्थात 1473 कोटी लीटर (14,730 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 76.08 टक्के अर्थात 612.10 कोटी लीटर (6,121 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.