अंधेरीत गोखले ब्रिजचा फूटपाथ कोसळला मुंबई: मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.  फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला. हा पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.

तब्बल तेरा तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्वपदावर आली आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने ट्रायल लोकल सोडण्यात आली होती. त्यानंतर 8 वाजून 23 मिनिटांनी चर्चगेटच्या दिशेने (अप) जलद वाहतूक सुरु झाली. तर रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी विरारच्या दिशेने (डाऊन) लोकल वाहतूक सुरु झाली.

ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. 5 जण जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.

अंधेरी, विलेपार्ले, घाटकोपर, चेंबूर आणि कुर्ल्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. तर लालबाग, परळ, दादर या भागातही पाऊस कोसळत आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने खार सबवे, एस. व्ही रोड आणि एलबीएस रोड अशा सखल भागात पाणी भरले. या पावसाने काही ठिकाणी रस्ते वाहतूक मंदावली.

काल रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत कुलाबा परिसरात 64.2 मिलीमीटर तर सांताक्रूझमध्ये 96.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दरम्यान 6 जुलैपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

LIVE UPDATE 

Continues below advertisement


9.41 PM जलद मार्गावरील डाऊन दिशेने लोकल वाहतूक सुरु


8.23 PM चर्चगेटच्या दिशेने (अप) जलद लोकल सुरु


7.58 PM अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने ट्रायल लोकल रवाना, पूल दुर्घटनेनंतर विस्कळीत झालेली वाहतूक बारा तासांनी पूर्वपदावर, विरार ते चर्चगेट जलद मार्गावरील वाहतूक सुरु होणार


7 PM UPDATE पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते गोरेगाव दरम्यान वाहतूक अद्यापही ठप्प, चर्चगेट ते वांद्रे आणि गोरेगाव ते विरार सेवा सुरु, गोरेगाव-वांद्र्यादरम्यान हार्बरचा पर्याय


मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने


हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वेची वाहतूकही उशिराने


3.49 PM कोसळणारे ब्रिज, रस्त्यांवर पूर, अडकलेले नागरिक,  स्थानिक प्रशासनच कोसळलंय, मुंबईकरांबद्दल मला सहानुभूती आहे, सुरक्षित राहा : राहुल गांधी





2. 15 PM - हार्बर मार्गावर अंधेरीहून वडाळ्याकडे जाणारी पहिली लोकल सुटली, पूल दुर्घटनेच्या सात तासांनी लोकल धावली


1.15 PM -  महापौर विश्वनाथ महाडेश्वर-


कोसळलेला पूल हा रेल्वेचा आहे, त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही रेल्वेची. देखभालीसाठी बीएमसी रेल्वेला मागणीनुसार पैसेही देते.   रेल्वेने जबाबदारी टाळू नये. आम्ही जबाबदारी कधीच झटकत नाही. पूलाची जबाबदारी बीएमसीची आहे हे सांगत रेल्वे प्रशासन दिशाभूल करतेय. खा. किरीट सोमय्या काय बोलतात, याबद्दल मी बोलणं योग्य नाही. मुंबईकरांना माहित आहे ते कशी वक्तव्य करतात ते.

- एलफिन्स्टन ब्रिज दूर्घटनेनंतर चर्चगेट ते विरार पर्यंतचे सर्व पूल चांगले असल्याचे सांगणारा रेल्वेचा अहवाल खोटा आहे का ? हा खोटा अहवाल बनवला गेला तर जबाबदारी कुणाची?

12.50 PM वेस्टर्न एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडी



12.30 PM  अंधेरीतील गोखले ब्रिजचा फूटपाथ कोसळल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. केवळ विरार ते बोरीवली या दरम्यान लोकलसेवा सुरु आहे. विरारवरुन मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. काही प्रवासी तर दोन ते तीन तास रेल्वे स्थानकावर बसून होते. काही प्रवाशांनी घरी जाणचं पसंत केलं. रेल्वे विभागाकडून प्रवाशांना रेल्वे कधीपर्यंत पूर्वपदावर येईल याबाबत सांगत नव्हते. त्यामुळे प्रवासी कमालीचे संतापले होते.

12. 20 PM - एल्फिन्स्टन घटनेनंतर सरकारने दावा केला की सर्व पुलांचं ऑडिट करु. मात्र  त्यानंतरही अशी घटना घडते, हे संतापजनक आहे. मुंबईकरांचे जीव जातात जबाबदारी कुणाची? मुंबई महापौर बौद्धिक दिवाळखोर झालेत का काय अशी शंका उपस्थित होते - राधाकृष्ण विखे पाटील

12 .05 PM मध्यरात्रीपर्यंत पश्चिम रेल्वे सुरळीत होणार नाही, पनवेल- अंधेरी दुपारी 2 पर्यंत सुरु करणार, अंधेरीवरुन फास्ट ट्रॅकवरील वाहतूक संध्या. 5-6 वा सुरु करणार, मात्र स्लो ट्रॅक सुरु करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो, वाहतूक सुरळीत होण्यासाठी उद्याचा दिवस उजाडण्याची चिन्हं

11. 54 AM - वांद्र्याजवळ बेस्टच्या डबल डेकर बसला अपघात


11.24 AM - रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईचे आहेत, त्यांना मुंबईच्या अडचणी माहित आहेत. मात्र असं असूनही केंद्र सरकार मुंबईच्या विकासाला निधी पुरवत नाही. शिवसेना-भाजप जबाबदारी ढकलत आहे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे



11. 20 AM - गोखले पूल फुटपाथ दुर्घटनेची संपूर्ण चौकशी रेल्वेने करावी. प्रशासनाने सर्वात आधी नागरिकांची काळजी करावी : विनोद तावडे



11.09 AM   ढिगारा उपसताना ओव्हरहेड वायरचा खांब कोसळण्याच्या स्थितीत, बचाव पथक आणि जवानांना हटवलं



11.05 AM बेस्टकडून वेस्टर्न लाईनवर 39 जादा बसेस, वांद्रे ते अंधेरीदरम्यानची घटना

11. 00 AM - ढिगारा उपसण्यासाठी क्रेन आणली, युद्धपातळीवर काम सुरु

10.47 AM - ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून श्वानपथकाला पाचारण



10.30 Am - गोखले पुलाची जबाबदारी रेल्वेची, मुंबईच्या महापौरांचा दावा

10.20 AM ढिगारा हटवण्यासाठी 4 ते 5 तास लागण्याची शक्यता, पश्चिम रेल्वेवरील वांद्रे-अंधेरी-गोरेगाव लोकल वाहतूक चारपर्यंत सुरु होण्याची चिन्हं

10.10 am - अंधेरीपासून विविध 31 मार्गावर जादा बसेस, तर चर्चगेट ते वांद्रे जादा लोकल सोडल्या. विरार ते गोरेगाव लोकल वाहतूकही सुरळीत करण्याचा प्रयत्न

10.00 am   हेल्पलाईन नंबर - अंधेरी - 022676 30054,  चर्चगेट - 02267622540, बोरिवली -  02267634053, मुंबई सेंट्रल-  02267644257

9.45 AM अंधेरीत गोखले ब्रिज कोसळला: मुख्यमंत्र्यांची मुंबई पालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी बातचीत, सीपींना वाहतूक सुरळीत करण्याच्या, तर पालिका आयुक्तांना बेस्ट बसेसची संख्या वाढवण्याच्या सूचना

ट्रॅफिक अपडेट


-अंधेरी पूर्व ते पश्चिम प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बिस्लेरी जंक्शन-तेली गल्ली-सुर्वे चौक-अंधेरी सब वे-एस व्ही रोड या मार्गाचा वापर करावा

-अंधेरी पश्चिम ते पूर्व प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जेव्हीपीडी-सुजय हॉस्पिटल जंक्शन-मिठीबाई कॉलेज-एसव्ही रोड-कॅ. गोर उड्डाणपूल पार्ले-पार्ले पूर्व-आधार जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मार्गाचा वापर करावा

-एसव्ही रोड ते वेस्टर्न हायवे किंवा वेस्टर्न हायवे ते एसव्ही रोड जाणाऱ्यांसाठी सूचना : मृणलताई गोरे उड्डाणपूल/खिरा नगर जंक्शन-मिलन उड्डाणपूल/ खार सब वे या मार्गाचा वापर करावा

9.44 AM पश्चिम रेल्वेचा सर्व ताण रस्ते वाहतुकीवर, एस व्ही रोड जॅम, सांताक्रूझ-लिंक रोड, वेस्टर्न एस्क्सप्रेस हायवेवर कोंडी, अंधेरी-कुर्ला रोडवर ट्रॅफिक जॅम, सायन-पनवेलही धीमा

9.42 AM पूल कोसळल्यानंतर हद्दीचा वाद, अंधेरीचा गोखले पूल हा रेल्वे प्रशासनाच्याच अखत्यारित येत असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा

9.34 AM चर्चगेट ते वांद्रे आणि विरार ते गोरेगाव लोकल रेल्वे वाहतूक सुरु, वांद्रे ते गोरेगाव  दरम्यानची वाहतूक मात्र ठप्प

9.15 AM कोसळलेला गोखले ब्रिज 1960 मध्ये बांधल्याची प्राथमिक माहिती. अतिशय जीर्ण झालेला ब्रिज अखेर कोसळला.  कोसळलेला पूल MMRDA आणिBMC चा होता

9.11 AM ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात यश, तातडीने रुग्णालयात दाखल

9. 00 AM अंधेरीत दुसऱ्यांदा गोखले पुलाचा फुटपाथ कोसळला



8. 56 AM  फुटपाथ कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली एकजण अडकल्याची भीती.

8. 48 AM फुटपाथ कोसळल्याने रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला, अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु, रेल्वे वाहतूक सुरु करण्याचं मोठं आव्हान

8.45 AM - पश्चिम रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प

8.39 AM - फूटपाथ कोसळल्यानंतर, गोखले पुलावरील रस्ते वाहतूकही रोखली, मुंबई पोलिसांची माहिती


8.32 AM - अंधेरीत ब्रिजचा फूटपाथ कोसळल्याने दोन पादचारी जखमी, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

8. 28 AM - गोखले ब्रिजचा फूटपाथ सकाळी 7.35 वाजता कोसळल्याची माहिती

8.21 AM - अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणारा गोखले ब्रिजचा फूटपाथचा काही भाग कोसळला.

8.20 : चर्चगेटपासून - विले पार्लेपर्यंत तर  अंधेरीपासून - बोरिवलीपर्यंत लोकल उभ्या, अंधेरीत पादचारी पूल कोसळल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद

8.12 AM अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला, पश्चिम रेल्वेची दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प



8.07 Am #मुंबई पाऊस LIVE: अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरीहून विरारकडे जाणारी वाहतूक ठप्प, चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम

8.05 AM मुंबई पाऊस LIVE: अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरीहून विरारकडे जाणारी वाहतूक ठप्प

7.58 AM अंधेरी स्टेशनवर ओव्हरहेड ब्रिजच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, डाऊन मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद

7. 45 AM - मुंबई लोकल वाहतूक सुरळीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं रेल्वेचं आवाहन




अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?

- सकाळी साडे सात वाजता गोखले पुलाचा फुटपाथ कोसळला

- ओव्हरहेड वायर तुटल्या.

- पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक बंद

- घटनेत दोन जण जखमी, एक जण अडकल्याची भीती, एकाला बाहेर काढण्यात यस

- चर्चगेट ते वांद्रे, विरार ते गोरेगावपर्यंत वाहतूक सुरु

- ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.

- ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.

- पूल 1960 साली बांधल्याची माहिती

- एनडीआपएफ, अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु

मान्सूनची स्थिती

राज्यात मान्सूनच्या आगमनाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात १० ते १२ दिवस पावसानं खंड दिला. काही भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या काही दिवसात राज्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झालेला दिसतोय.

सुरुवातीला जोरदार बरसलेला मान्सून आता लपंडाव खेळताना दिसतोय. बऱ्याच भागात पिकांना संरक्षित पाणी देण्याची वेळ आली आहे.  येत्या 24 तासात कोकण गोव्यात  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.



1 जून ते 1 जुलै दरम्यानपडलेल्या मान्सूनची विभागवार आकडेवारी

कोकण विभागात सरासरी ७३८.५ मिमी पाऊस होतो. तिथे १०१३.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात सरासरी १५१.९ मिमी पाऊस पडतो. तिथे १६३.३ मिमी म्हणजेच ७ टक्के जास्त पाऊस झाला.

मराठावाड्यात सरासरी १४८.९ मिमी पाऊस होतो. तिथे १८८.८ मिमी म्हणजेच २७ टक्के जास्त पाऊस झाला.

तर विदर्भात सरासरी १७७.२ मिमी पाऊस होतो. तिथे १९७.५ मिमी म्हणजेच २७ टक्के जास्त पाऊस झाला.

संपूर्ण राज्यात सरासरी २१५.२ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा २६२.१ मिमी म्हणजेच सरासरीच्या २२ टक्के जास्त पाऊस झाला.

तालुकानिहाय आकडेवारी

गेल्या महिनाभरात २२७ तालुक्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. ४८ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. ३२ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्क्य़ांपर्यंत पाऊस झाला. १७ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस पडला. तर जवळपास २१ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे.