इटालियन महिलेचा विनयभंग, मुंबईत दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2018 11:56 PM (IST)
मुंबई पोलिसांनी आरोपी टुरिस्ट गाईड राकेश नंदीसह ओला चालकाला अटक केली आहे.
मुंबई : मुंबईत फिरायला आलेल्या 37 वर्षीय परदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपी राकेश नंदीसह ओला चालकाला अटक केली आहे. इटलीची पीडित महिला 11 जूनला बंगळुरुहून मुंबईत फिरण्यासाठी आली होती. 14 तारखेला गेट वे ऑफ इंडिया पाहिल्यानंतर ती स्वतःला गाईड म्हणवणाऱ्या आरोपीच्या संपर्कात आली. आरोपीने 'ओला' टॅक्सी बुक केली. एका वाईन शॉपवर टॅक्सी थांबवली. कुलाब्याहून जुहूला जाताना प्रवासात आरोपीने आपला विनयभंग केला, असा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. विनयभंगाच्या घटनेचा व्हिडिओ शूट करुन तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकारानंतर महिलेनं आपली कशीबशी सुटका करत हॉटेल गाठलं. पुढे बंगळुरुहून दिल्ली गाठत तिने इटालियन दुतावासाला ही माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.