Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईत पहिल्याच पावसात वाहतूक व्यवस्था सोमवारी (26 मे) कोलमडून पडली. आतापर्यंत रस्ते आणि रेल्वे ठप्प झाल्याच पाहायला मिळत होतं. मात्र यात नव्याने भुयारी मेट्रोची (Mumbai Rains Aqua Line Metro) भर पडलेली पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो तीन या भुयारी मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पहिल्या पावसातच या भुयारी मेट्रोच्या स्थानकामध्ये पाणी शिरल्याने मोठा अपघात टळलाय. त्यामुळे भुयारी मेट्रो हे खरंच सुरक्षित आहे का?, असं प्रश्न समोर येतोय. मात्र याचंच उत्तर स्वतः एमएमआरडीएने दिलेलं पाहायला मिळतय. या भुयारी मेट्रोचा काम सुरू असताना माहितीच्या अधिकारात एमएमआरडीएने मुंबईत भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचं 2017 साली एका माहीतीच्या अधिकारात उत्तर देताना म्हटलं आहे.
एक प्रकारे भुमिगत मेट्रो पावसाळ्यात सुरक्षित नसल्याचं कबुल केलेल पाहायला मिळतंय. एस व्ही रोडवरील मेट्रोही ही भुयारी करावी अशी स्थानिकांनी मागणी केली होती. तेव्हा या मागणीला माहीतीच्या अधिकारातून उत्तर देताना एमएमआरडीएने हे उत्तर दिल होतं. मुंबईत मुसळधार पाऊस झाला तर भुयारी मेट्रोला अडथळा निर्माण होऊ शकतो. मुसळधार पावसात एलिव्हेटेड मेट्रो आणि मोनोरेल सुरु राहू शकते. जर एमएमआरडीएला हे माहीत होतं तर एमएमआरडीएने मेट्रो तीन भुयारी मेट्रो का सुरु केली...सुरु केल्यानंतर या मेट्रोच्या सुरक्षेची काळजी का घेतली नाही?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, भुमिगत मेट्रो सेवा आजही बंद ठेवण्यात आली आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी भुमिगत मेट्रो बंद आहे. वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरुन झालेल्या नुकसानानंतर मेट्रो प्रशासनाकडून दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम सुरु आहे.
भुयारी मेट्रो सुरक्षित वाटत नसेल तर, घाट का घातला?
मुसळधार पाऊस पडला तर भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याची पुर्णपणे एमएमआरडीयला जाणीव होती. 2017 मध्ये माहीतीच्या अधिकारात एमएमआरडीयने दिलेल्या उत्तरात याची कबुली देण्यात आली होती. मेट्रो 3 जर भुमिगत होऊ शकते तर एसव्ही रोडवरील मेट्रो ही भुमिगत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. याला माहीतीच्या अधिकारात उत्तर देताना मुंबईत भुयारी मेट्रो का योग्य नाही हे पटवून देताना एमएमआरडीयने उत्तर दिलं होतं. त्यामुळे जर एमएमआरडीयला भुयारी मेट्रो सुरक्षित वाटत नसेल तर मग या भुयारी मेट्रो 3 चा घाट का घातला गेला?, जरी हा घाट घातला असली तर ही मेट्रो सेवेत येण्याच्या आधी पुरेसी काळजी का घेतली गेली नाही?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबईतील भुयारी मेट्रोच्या संदर्भात एमएमआरडीएने काय म्हटलंय?
मुसळधार पावसात जेव्हा शहरातील रस्ते पाण्याखाली जातात तेव्हा सर्व ग्रेड सिस्टीम आणि भूमिगत सिस्टीमवर गंभीर परिणाम होतो. काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या मुसळधार पुरात, फक्त एलिव्हेटेड मेट्रो आणि मोनोरेलच कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करत होत्या. सर्व आवश्यक खबरदारी असूनही अशा मुसळधार पुरात भूमिगत मेट्रो प्रभावित होण्याची शक्यता असते, असं एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.