Ashish Shelar on Aditya Thackeray : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मुंबईत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे आता पाहणी करायला आले आहेत. जनतेने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारायला हवेत. नालेसफाई चालू असताना तुम्ही कुठे होता? तेव्हा मिस्टर इंडियासारखे गायब झाले होते अशी टीका शेलार यांनी केली.
आदित्य ठाकरे पाहणी कुठे करत होते लंडनच्या थिम्स नदीवर की पॅरीसवर असा टोलाही शेलारांनी लागवला. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी कट कमिशनचा धंदा केला. यामुळं ही अवस्था झाल्याचे शेलार म्हणाले. चोर मचाए शोर ही अवस्था झाली आहे. 26 जुलै 2005 जो महाप्रलय मुंबईने पाहिला, त्यावेळी तत्कालिन महापालिकेचं नेतृत्व का नाही केलं? तेव्हा कुठल्या पंचतारांकीत हॉटेलला होते. असा सवाल शेलार यांनी केला.
3 लाख कोटी रस्त्यांवर खर्च केले मग खड्डेमुक्त रस्ते का नाही झाले?
आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे. 1 हजार कोटी ज्या कंत्राटदाराने खाल्ले त्यांच्याशी तुमचा संबध आहे का? एका कलाकाराची चौकशी होणार आहे असे शेलार म्हणाले. 3 लाख कोटी रस्त्यांवर खर्च केले मग खड्डेमुक्त रस्ते का नाही झाले? असा सवालही शेलारांनी केला. मुंबईला तुंबई करण्यामागे यांचा हात आहे असी टीका शेलारांनी केली.
राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे . सोमवार सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे .अरबी समुद्र खवळला असून सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत . मान्सून न महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे .पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे .आज ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी, पुण्याच्या व साताऱ्याच्या घाट परिसरात, पावसाचा रेड अलर्ट आहे . आज पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे .