Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Maharashtra Rain: मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने सध्या शहरात पाणीकपात आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई: जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वरुणराजाची कृपा आपल्यावर कधी होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांना या महिन्यात काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या चार दिवसांमध्ये बऱ्यापैकी पाऊस (Rain) झाला आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही मुंबईत (Mumbai Rain) मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज पहाटेपासून मुंबईत पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, अद्याप संततधार पाऊस सुरु झालेला नाही. ही परिस्थिती येत्या काही तासांमध्ये बदलू शकते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जुलै महिना हा पावसाचा असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुलै महिन्यातील पहिले चार दिवस मुंबई पाऊस पडत असला तरी तो विनाखंड झालेला नाही. केवळ अधुनमधून पावसाच्या सरींचा शिडकावा आणि दिवसातील बराचवेळ पाऊस विश्रांती घेत असल्याने हवेतील उकाडा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 0.8 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 2.1 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, शुक्रवारी पोषक वातावरण असल्याने मुंबईत मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. परिणामी मुंबईकरांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.
कोकण, पालघरमध्येही पावसाचा जोर वाढणार
मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर, पुणे, कोल्हापूर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा कायम आहे. जुलै महिन्यात 106 टक्क्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती.
5 ते 10 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात पावसाचा जोर जास्त राहील, असा अंदाजही माणिकराव खुळे यांनी वर्तवला.
आणखी वाचा
जुलै महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? कुठं कुठं पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर