मुंबई: हवामान खात्याच्या वतीने 2 आणि 3 जुलैला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरी या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सायन, हिंदमाता, वरळी नाका परिसर जलमय झाल्याचे चित्र आहे. हिंदमाता परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तर पावसामुळे पाणी साचलं असल्यानं अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या 24 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून देखील सर्वसामान्य नागरिकांना ट्विट करून घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मुलुंड परिसरात मुसळधार
मुंलुड परिसरात मुसळधार पावसासोबत जोरदार वाराही सुरु आहे. त्यामुळे या परिसरात पावसाचा जोर अधिक दिसून येतोय. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतुक व दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होत नसला तरी हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली आहे. सकाळपासून आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं नसलं तरी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. लाॅकडाऊनमुळे रस्त्यावर तशी फार गर्दी नाहीय पण तुरळक प्रमाणात गाड्या आहेत.  अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या लोकांवर या पावसाचा परिणाम होत आहे.



रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेनं जिल्हा प्रशासनाला ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी मुंबई, पनवेलमध्येही पावसाची दमदार हजेरी

नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, बेलापूर परिसरात तर पनवेलसह कामोठे, खारघर परिसरात देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान सकाळी 11 वाजेपासून पनवेलमध्ये पावसाने जास्त जोर धरला.

वाशिम : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वाशिम जिल्ह्यात रात्री पासून अनेक ठिकाणी रिमझिम तर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. रात्रीपासून पडणारा पाऊस सकाळी 8 वाजेपर्यंत अनेक भागात ढगांच्या गडगडाटांसह पाऊस सुरु होता. हिंगोलीतही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.