ठाणे : ठाणेकरांनी लॉकडाऊनचा पहिला दिवस अतिशय शिस्तबद्ध रीत्या पाळला. काल (गुरुवारी) ठाण्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तुरळक माणसे दिसून येत होती. तसेच भाजी मंडई आणि धान्य बाजारपेठ सुरु असून देखील त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे covid-19 ची साखळी तोडण्यासाठी प्रशासनासोबत ठाणेकरदेखील या लढाईत उतरले असल्याचे चित्र बघायला मिळाले.


ठाण्यातील कोविड-19 ची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ठाण्याच्या आयुक्तांनी दहा दिवसांच्या पूर्णतः लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ठाणेकरांनी देखील चांगला प्रतिसाद प्रशासनाला दिला. वेगवेगळ्या भागात आम्ही पडताळणी केली असता तिथे रस्त्यावर माणसांची गर्दी दिसून आली नाही. नौपाडा, वागळे इस्टेट, आनंदनगर, कळवा, मुंब्रा, लोकमान्य नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एबीपी माझा टीमने पडताळणी केली.


लॉकडाऊन जरी असले तरी ठाण्यात भाजीपाला आणि धान्य उपलब्ध असणार आहे. याबाबतीत थोडा संभ्रम सुरुवातीस निर्माण झाला होता. मात्र आता पोलिसांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मंडई सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच धान्य बाजारपेठ देखील सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या जीवनावश्यक वस्तू ठाण्यात उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त तर सर्व दुकाने बंद राहतील. दुकानदारांनी देखील या बंदला उत्तम प्रतिसाद दिला आहे.


पाहा व्हिडीओ : ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन



ठाणे ट्रॅफिक पोलिसांची कारवाई


लॉकडाऊन असूनही घराबाहेर विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या नागरिकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी चांगलीच कारवाई करत लाखोंचा दंड देखील वसूल केला. यामध्ये दुचाकीवर डबल सीट बसणे, तीन चाकी आणि चार चाकी वाहनात क्षमते पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे, हेल्मेट न घालणे अश्या कारवाईंचा समावेश देखील समावेश आहे. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळी 6 पर्यंत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहूया. ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कळवा आणि मुंब्रा हे सर्व विभाग येतात. या सर्व विभागात मिळुन एकूण 316 वाहनांवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. यात 249 दुचाकी, 56 तीन चाकी आणि अकरा चारचाकी वाहनांवर कारवाई केली गेली. दिवस भरात एकूण 2744 चलान दिले गेले. तर 13 लाख 09 हजार दोनशे रुपयांचा दंड दिवसभरात आकारला गेला.


महत्त्वाच्या बातम्या : 


मुंबईत 60 लाखांचा हिरोइन जप्त; गुन्हे शाखेची कारवाई


कारागृहात फैलावणाऱ्या कोरोना संदर्भातील याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर


कोरोना बाधित रुग्णांवर उपचारांसाठी जास्त पैसे घेतल्याने नानावटी रुग्णालयावर गुन्हा; मुंबई महापालिकेची कारवाई