Mumbai Rain : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत (Mumbai) आज पहाटेपासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं वातावरण आल्हाददायक झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पाऊस जर नाही पडला तर खरीपाची पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण आणि नद्यांच्या पाणीसाठ्यात देखील घट होत आहे. त्यामुमुळं सध्या पावसाची गरज आहे. दरम्यान, मुंबईत उघडीप घेतलेला पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे. पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
या भागात पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागरात पुन्हा एखाद्या वातावरणीय प्रणालीची निर्मिती होऊ शकते. तिचे मध्य भारतात (उत्तर छत्तीसगड दरम्यान) वायव्य दिशेने होणारे स्थलांतरण आणि परिणामकारक प्रभावामुळं महाराष्ट्रात पुढे पाऊस होऊ शकतो. कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र केवळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट
मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी खरीपाची पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडं पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात एक महिन्यात टँकर दीडपटीने वाढले आहेत. ऑगस्टमध्ये मराठवाड्यात टँकरची मागणी वाढू लागली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात टँकरची मागणी वाढू लागली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी 404 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 41 तर जालना जिल्ह्यात 43 टँकर, मराठवाड्यात 84 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्यात 36 टॅंकर होते.
पावसानं ओढ दिल्यामुळं जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
राज्यात आत्तापर्यंत 96 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या (kharif crop Sowing) पूर्ण झाल्या आहे. राज्यात सरासरी 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जाते. आत्तापर्यंत 137 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीच याच कालावधीत 140 लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र थोड्या प्रमाणात घटलं आहे. सध्या पावसानं ओढ दिल्यामुळं खरीपाची पीकं धोक्यात आली आहेत. तसेच पावसानं ओढ दिल्यामुळं जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: