मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यात जमा आहे. कारण, गेल्या आठवडाभरात मुंबईत झालेल्या पावसामुळे (Mumbai Rain) मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव (Mumbai Lakes) ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द होणार आहे. पुढील आठवड्यापासून पाणीकपात (Watercut in Mumbai) रद्द करण्याचा हा निर्णय लागू होणार आहे. 


मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी सहा वाजेपर्यंत पाणीसाठा 66.77 इतका नोंदवण्यात आला आहे. सध्या मोडकसागर तलावातून 13334 क्युसेक तर तानसा जलाशयातून 17680 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पवई आणि तुळशी तलाव यापूर्वीच भरले होते. त्यामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव पूर्णपणे भरले आहेत. सध्याच्या पावसाचा जोर पाहता उर्वरित तीन तलावही ऑगस्ट महिन्यात भरण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटेल.


यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने ही सगळी कसर भरुन काढली.


मुंबईतील पाणीकपात रद्द होणार


या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली 10 टक्के पाणीकपात ही सोमवार दिनांक 29 जुलै 2024 पासून मागे घेण्यात येत आहे. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.


मुंबईला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट


मुंबईत गुरुवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पहाटेपासूनच मुंबईला पावसच्या जोरदार सरींना झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने मुंबईला शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईतील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा-कार्यालयांना सुट्टी, हवामानाचा ताजा अंदाज काय?