Local Train Updates Mumbai Heavy Rain मुंबई: राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत देखील पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या काही तासांपासून पावसाच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला झोडपून काढत आहेत. यामुळे आता मुंबईतील लोकलसेवेवर (Mumbai Local Train) देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सेवा सध्या उशिराने सुरु आहेत. जोरदार पाऊस असल्याने गाड्यांचा वेग मंदावला असून कर्जत कसारा इथून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस उशिराने आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या लोकल देखील 10 ते 15 मिनिटं उशीराने धावत आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने धाव आहेत. हार्बर मार्गावरील लोकल देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने आहेत.  


कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय-


ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी आज पहाटेपासून तुफान पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय होत आहे. 


ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.


विहार, तानसा तलाव भरले-


संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्त्वाचा असणारा विहार तलाव आज मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 2,769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) एवढी आहे. तर पूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचा असणारा तानसा तलाव आज सायंकाळी 4.16 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. तानसा धरणाचे 3 दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून 3,315 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता 14,508 कोटी लीटर इतकी आहे.