Mumbai News : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. खड्ड्यामध्ये (Potholes) गाडीचं चाक अडकून झालेल्या अपघातात एका दाम्पत्याला प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई (Mumbai) उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्कसमोर (Borivali National Park) काल (17 ऑगस्ट) दुपारी हा अपघात झाला. अपघातातील मृत दाम्पत्य हे अंधेरी (Andheri) पूर्वमधील मरोळच्या चिमटपाडा इथे राहत होतं. 


मरोळच्या चिमटपाडामध्ये राहणारे नाझीर हुसेन शाह (वय 43 वर्ष) आणि त्यांच्या पत्नी छाया तुकाराम खिलारे (वय 43 वर्ष) हे दोघे जण दुपारी नायगावमध्ये शूटिंगसाठी बाईकवरुन कामाला जात होते. पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन जाताना बोरिवली नॅशनल पार्कसमोर असलेल्या खड्ड्यामध्ये त्यांच्या दुचाकीचं चाक अडकलं. यामुळे दोघीही दुचाकीवरुन खाली पडले. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरच्या खाली येऊन या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.


नाझीर हुसेन शाह आणि त्यांची पत्नी छाया खिलारे मरोळच्या चिमटपाडा परिसरामध्ये आपली आई आणि पाच वर्षांच्या मुलासोबत राहत होते. नाझीर आणि छाया यांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मंगळवार (16 ऑगस्ट) घरी वाढदिवस साजरा केला होता. तर काल सकाळी नाझीर आणि छाया यांनी मुलाला तयार करुन शाळेत पाठवलं. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास दोघेही मरोळमधून नायगावमध्ये शूटिंगच्या कामासाठी जात होते. त्या दरम्यान बोरिवली नॅशनल पार्कच्या समोर असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बाईकच चाक अडकून ते खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरने या जोडप्याला चिरडलं. त्यात त्यांनी जागीच प्राण सोडले.


या घटनेची माहिती मिळताच बोरिवली पूर्वेतील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठवले. तर आरोपी डंपर चालक सलीम शेख (वय 25 वर्ष) याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक करुन पुढील तपास करत आहेत.


मात्र या सगळ्यात या दाम्पत्याचा पाच वर्षाच्या मुलगा आई-वडिलाविना पोरका झाला आहे. खड्ड्यांमुळे या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर आई-वडील गमावण्याची वेळ आली. मुलाच्या आई आणि वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्याची देखभाल कोण करणार असा प्रश्न नाझीरची आई यांनी सरकारला विचारला आहे.


मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून वाट काढणं वाहनचालकांना कठीण होतं. या खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे सरकार याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.