Mumbai Pollution : प्रदूषणामुळे मुंबईही  प्रदूषणाच्या  (Mumbai Pollution) विळख्यात अडकली आहे. कारण सलग चौथ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षाही खराब स्थितीत आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 312 वर तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एक्यूआय 308 वर गेला आहे.  


नवी मुंबई, माझगाव आणि चेंबूर परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 350 पार म्हणजे अतिधोकादायक परिस्थितीत आहे. नवी मुंबईतील एक्यूआय 368 चेंबूरमधील एक्यूआय 363 वर तर माझगावमधील एक्यूआय 356 वर गेला आहे. अंधेरी आणि बीकेसीतील हवा गुणवत्ता अतिधोकादायक स्थितीत आहे. अंधेरीतील एक्यूआय 319 वर तर बीकेसीतील एक्यूआय 312 वर  गेला आहे. पुढील दोन दिवस मुंबईतील हवा प्रदूषितच राहण्याचा अंदाज आहे. 


मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सरकारवर टीका  केली आहे. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लानसंदर्भात सरकार गंभीर नाही, यासंदर्भात सरकारने काम देखील थांबवल्याची टीका होत आहे. मेट्रोची सुरु असलेली कामं, रस्त्यांवर वाढलेली वाहनांचा संख्या आणि धुळीच्या एकत्रित परिणामांमुळे परिस्थिती ढासळल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे. यामुळे आजारी लोकांना आरोग्यविषयक अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरुन श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करणं फायद्याचं ठरेल.


हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते?


Particulate Matter (PM) 2.5, PM10, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनोक्साईडच्या स्तराच्या आधारावर हवेची गुणवत्ता तपासली जाते. PM हा अत्यंत सूक्ष्म कण आहे, जो आरोग्याला हानी पोहोचवतो. हवेत PM 2.5 आणि PM10 असणे अतिशय धोकादायक मानलं जाते.


हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?



  • शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम 

  • 50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक 

  • 101 ते 200 एक्यूआय - मध्यम 

  • 201 ते 300 एक्यूआय - खराब 

  • 301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब 

  • 401 ते 500 एक्यूआय - गंभीर 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Mumbai Pollution : वायू प्रदूषणावर तात्काळ उपाययोजना, बांधकाम कामकाज 10 दिवस बंद ठेवण्याच्या सूचना