Mumbai Crime News : जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्डचा (Debit Card) पासवर्ड म्हणून मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख ठेवत असाल तर तुम्हाला सावध व्हावं लागणार आहे. मुंबईत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईच्या बोरिवली भागात मागील काही दिवसांपासून बस स्टॉपवर उभ्या राहणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच चोरलेल्या पर्समधून मिळालेल्या कार्ड्सचा गैरवापर करुन दोन चोरट्यांनी महिलांची बँक खाती रिकामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 


चोरलेल्या पर्समध्ये सापडलेल्या एटीएम कार्ड, डेबिट कार्डचा वापर करुन दोन चोरट्यांनी एटीएममधून पैसे काढून ऑनलाईन शॉपिंग केली आहे. या चोरट्यांनी अशाच प्रकारे अनेक महिलांची बँक खाती रिकामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांच्या तक्रारीनंतर या दोन चोरट्यांना बोरिवली एमएचबी कॉलनी पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली आहे. 


सापळा रचून अटक


मीरा रोडमध्ये राहणारी एक महिला बोरिवलीमधून बस पकडण्यासाठी उभी असताना या दोन्ही चोरट्यांनी त्या महिलेची पर्स लंपास केली. महिलेच्या पर्समध्ये 16500 रुपये कॅश तर बँकेचं डेबिट कार्डसुद्धा होतं, मात्र या चोरट्यांनी डेबिट कार्डच्या माध्यमातून त्याच्या बँक अकाउंटमधून सर्व रक्कम काढून घेतली. महिलेने एम.एच.बी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर एम.एच.बी पोलिसांनी ज्या एटीएममधून पैसे काढले, त्या एटीएमचं लोकेशन शोधून काढलं. त्यातून पैसे मालवणी परिसरातील ATM मधून काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


मालवणीमध्ये एटीएममधून पैसे काढताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. यानंतर एम.एच.बी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन चोरट्यांना मालवणी परिसरामधून सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव साजिद अब्दुल खान (43), हमीद अब्दुल खान (47) आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून एम.एच.बी पोलिसांनी 50 हजार रुपयांची रोकड, महिलांच्या चोरीला गेलेल्या 8 पर्स, 5 मोबाईल फोन आणि डेबिट कार्ड हस्तगत केले आहेत. 


गर्दीच्या ठिकाणी एक धक्का द्यायचा, दुसरा पर्स चोरी करायचा


अटक करण्यात आलेले दोन्ही चोर मुंबईचा वेगवेगळ्या भागांमधून बस स्टॉपवर, गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये चढणाऱ्या महिलांना धक्का द्यायचे, त्यापैकी एक चोर पर्स चोरी करायचा, तर दुसरा चोर पर्स घेऊन पळून जायचा. सध्या एम.एच.बी पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. या चोरट्यांनी मुंबई शहरात किती ठिकाणी चोरी केली? आणि या चोरांच्या टोळीमध्ये आणखी साथीदार आहेत का? या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Police Officer Serial Rapist : 18 वर्षांच्या सर्विसमध्ये 24 बलात्कार अन्... पोलीसच निघाला सीरियल रेपिस्ट