मुंबई : सामान्य नागरिकांना नियम तोडण्यावरून पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र पोलिसच जर नियम तोडत असतील तर काय करायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  मुंबई पोलीस उपनिरीक्षकाला 'हेल्मट कुठे आहे, सिग्नल का तोडलात?', असे विचारल्यास 'तू कोण आहेस?, तुला जाब विचारण्याचा अधिकार नाही, निघ इथून, मी सिग्नल मोडेन, लोकांना उडवेन, तू कोण मला विचारणारा?', अशा उर्मट पद्धतीने पोलिसानं उत्तर दिल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच गाजतोय.



गणवेश घालून वाहतुकीचे नियम मोडणं मुंबई पोलिसांतील या पोलीस उपनिरीक्षकाला चांगलंच महागात पडलंय. मुंबई गोरेगाव परिसरात शुक्रवारी चक्क एका पोलिसानेच वाहतुकीचे नियम मोडले आणि त्याबद्दल एका सर्वसामान्य बाईकस्वारानं विचारणा केली असता त्या पोलीसानं उर्मटपणे अरेरावी करण्यास सुरूवात केली.

मात्र हा सगळा प्रकार त्या बाईकस्वारानं हेल्मेटवर लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. या पोलीस उपनिरीक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आणि हा पोलीस अधिकारी गोत्यात आला. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाविरोधात विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी सारखेच, त्यामुळे त्यांचं काटेकोरपणे पालन हे व्हायलाय हवं, अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिसांना दिल्या आहेत. मात्र संबंधित पोलीस उपनिरीक्षक विना हेल्मेट मोटरसायकल चालवत होता. इतकंच नव्हे तर तो दुचाकी चालवताना मोबाईलवरही बोलत होता. याही पुढे जाऊन त्यानं सर्रासपणे सिग्नलही तोडले.

हा उपनिरीक्षक मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागात कार्यरत आहे. हेल्मेट न वापरल्याबद्दल, सिग्नल मोडल्याबद्दल ई-चलन पाठवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या गैरवर्तनाबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना त्याच्या वरिष्ठांना दिल्याचं बोललं जातं आहे.