मुंबई : काँग्रेसने आज मुंबईत पक्षाचे सर्व आमदार, लोकसभा उमेदवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा सूर उमटला. नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. त्यांना काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचे आव्हान आहे.
काँग्रेसच्या आजच्या बैठकीत लोकसभा निवडणूक आणि राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विदर्भात काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी चर्चा झाली. त्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी नितीन गडकरी निवडणुकीत हरतील असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्याविरोधात तक्रारी मांडण्यात आल्या. पक्षातील ज्या नेत्यांनी पक्षाविरोधात काम केले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वांनी केली.
अहमदनगर दक्षिण मतदार संघावरुन विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वाद झाला होता, असे बोलले जाते. त्यामुळे विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळवली. मुलगा भाजपत गेल्यामुळे विखेंच्या पक्षनिष्ठेवर पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
काही दिवसांपूर्वी विखेंनी अहमदनगरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. तिथे विखेंनी शिवसेना उमेदवारासाठी भाषणही केले. शिवसेना नेत्यांनी विेखेंना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तर भाजपवासी असलेले विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी राधाकृष्ण विखे भाजपात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विखेंच्या राजकीय भूमिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे विखेंवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या दोन जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीत अडचणी आल्याची तक्रार करण्यात आली.
सर्वांच्या तक्रारी ऐकल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले की, पक्षाविरोधात काम करणाऱ्यांविरोधात अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर या सर्व नेत्यांवर कारवाई केली जाईल.
नितीन गडकरींचा पराभव निश्चित, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतला सूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2019 11:38 PM (IST)
काँग्रेसने आज मुंबईत पक्षाचे सर्व आमदार, लोकसभा उमेदवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा सूर उमटला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -