Weather Update News : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबईतही किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर 15.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं नवीन वर्षात मुंबईत हुडहुडी वाढली आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस तापमान कमीच राहणार आहे.
आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं थडी वाढली आहे. कुलाब्यात 18.05 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. देशातील अनेक भागात थंडीचा काडाका वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात गारठा चांगलाच वाढला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये तापमानात घट झाली आहे.
मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली
गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा (Mumbai Air quality) बिघडल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेला आहे. तर नवी मुंबईतही हवा गुणवत्ता निर्देशांक 342 अतिशय वाईट पातळीच्या जवळ पोहोचला आहे. मुंबई शहराचा एक्यूआय 303 वर अतिशय वाईट स्थितीत गेला आहे. तर मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावचा एक्यूआय 300 वरून वाईट अत्यंत खराब' पातळीच्या जवळ पोहोचली आहे.
उत्तर भारतात थंडी वाढणार
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा पारा (North India) आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिमालयातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळं वायव्य भारतातील मैदानी भागात किमान तापमानात घट झाली आहे. तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. दिल्लीत तापमानाचा पारा हा 10 अंश सेस्लिअसच्या आसपास घसरला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर भारतात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: