मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे परिसरातील घराबाहेर करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर कुठून कुठे गेले, याचा माग काढण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या दोन हल्लेखोरांनी रविवारी पहाटे सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या (Gun Firing) होत्या. या घटनेची माहिती समोर येताच मुंबईत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगवेगळी पथकं स्थापन करुन तपासाला सुरुवात केली होती. या तपासादरम्यान आता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग केल्यानंतर दोन्ही आरोपी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचले. वांद्रे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वरुन या दोघांनी सकाळी 5 वाजून 8 मिनिटांची बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन पकडली. मात्र, हे दोघेजण मध्येच सांताक्रुझ रेल्वे स्टेशनवर उतरले. पहाटे सव्वापाचच्या सुमारास हे दोघे सांताक्रुझ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उतरले. सांताक्रुझ रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघेजण वाकोल्याच्या दिशेने चालत गेले आणि त्यांनी एक ऑटोरिक्षा पकडली. यानंतर हे दोघेजण कुठे गेले, याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. त्यासाठी पोलिसांनी सांताक्रुझ स्थानक, वाकोला आणि आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
मुंबई पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास
गॅलेक्सी अपार्टमेंटच्या परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: सलमान खानला फोन केला होता. तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. राज्य सरकार आणि गृहमंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने फेसबुकवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे या हल्ल्याचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी आणि तपासाची सूत्रे वेगाने हलवली जात आहेत. पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. मात्र, दोन्ही हल्लेखोरांनी ज्या ऑटोरिक्षाने प्रवास केला त्या रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. रिक्षाचालकाशिवाय ज्या लोकांनी दोन्ही हल्लेखोरांना पाहिले आहे, त्यांच्याकडून पोलीस माहिती घेत आहेत.
आणखी वाचा