मुंबई : 7 लाख लोक संख्या असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा खळबळ माजली कारण दाटीवाटीची असलेली लोकवस्ती आणि चिंचोळ्या गल्ल्या असलेल्या धारावीला पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या पायवर उभं केलं


धारावी मध्ये जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा एकच चिंता वाढली कारण होतं मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या,चिंचोळ्या गल्ल्या, 10 × 10 च्या खोलीत राहणारे क्षमतेपेक्षा जास्त लोक आणि सार्वजनिक शौचालय त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना रोखण्यासाठी असलेले नियमांचं पालन करणं म्हणजेच तारेवरची कसरत होती. ही तारेवरची कसरत धारावीमध्ये असलेल्या धारावी पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना धारावी मध्ये राहणाऱ्या लोकांकडून करून घ्यायची होती.


मुंबईमध्ये 93 पोलीस स्टेशनपैकी एक असलेलं हे धारावी पोलीस स्टेशन आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेला धारावी मधील पोलीस कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लागण झाली मात्र तरीसुद्धा न खचता आपला कर्तव्य चोखपणे या जवानांनी पार पाडलं. यामध्ये सर्वात पुढे होते ते धारावी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश नांगरे, एखाद्या सेनापती सारखा रमेश नांगरे यांनी पुढे उभे राहून किल्ला लढवला आणि धारावीला पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यास सज्ज केले.


धारावीची ओळख आहे येथे राहणारा मोठ्या प्रमाणात मजूर आणि कामगार वर्ग. लॉकडाऊनमध्ये या कामगारांचा पोटाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि याला सुद्धा उत्तर म्हणून पुढे आले तेही पोलीस बांधव. सामाजिक संस्था यांना हाताशी धरून दररोज 40 ते 50 हजार गरिबांना दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली गेली तेथील कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत पुन्हा धारावी आपल्या जुन्या अवतारात येताना चित्र आहे...


पोलिसांनी नेमकं असं काय केलं की ज्यामुळे धारावीला पुन्हा आपल्या पायावर उभा राहता आलं.


धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली अत्यंत दाट लोकवस्ती अरुंद गल्ल्या यातून केवळ एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये सोशल डिस्टंसिंगच पालन करणं हे अत्यंत कठीण होतं. अशा वेळेला पोलिसांनी त्यांच्या गाडीतून ध्वनिक्षेपकद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. तसेच अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग करून त्यावरील ध्वनिक्षेपकद्वारे लोकांना माहिती दिली. या अत्याधुनिक ड्रोनमुळे जवळपास चार किलोमीटरचा परिसर पोलिसांना सहज व्याप्त आला.तर ज्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले.


तसेच कोरोनाबद्दल काय दक्षता घ्यावी याची ऑडिओ क्लिप बनवून त्याचे प्रसारण व्हाट्सअप ग्रुप द्वारे केले, सामाजिक सुरक्षा अंतर राखून मिटिंग घेऊन आणि मंदिर आणि मस्जिद यातील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांपर्यंत ती क्लिप त्यातील माहिती पोहोचवली.जीवनावश्‍यक वस्तूंची पोलिसांनी लोकांच्या घरापर्यंत पोहचवल्या जेणेकरून लोक घराबाहेर पडू नये तर काही सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन रोज चाळीस ते पन्नास हजार लोकांच्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली.


पोलिसांनी धारावीच्या विविध भागातील प्रत्येकी दोन-दोन स्वयंसेवकांना पोलिस स्टेशनला बोलावले आणि त्यांना कोरोना बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्यामार्फत त्यांच्या भागात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आणि लोकांची जनजागृती करण्याचे आवाहन केले. सामाजिक संस्थेच्या मदतीने धारावी मध्ये 2 लाख मास्क आणि 1 लाख सॅनिटायझर चे वाटप पोलिसांकडून करण्यात आले, तसेच 5 लाख रेडीमिक्स फुड पॅकेट्स चे वाटपही गरिबांना करण्यात आले.


धारावी भागात राजस्थान, झारखंड, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यातील बरेच परप्रांतीय कामगार कामानिमित्त आहेत. या काळात त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोठी जबाबदारी पोलिस विभागावर होती. या भागातील 61,415कामगार श्रमिक रेल्वेने आणि 12,495 कामगार एस.टी. बसने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. त्यामुळे ही जनता देखील काही प्रमाणात कमी झाली.


धारावी मध्ये पोलिसांकडून रूट मार्च आणि कोम्बिंग ऑपरेशनच वारंवार आयोजन करण्यात आलं. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये 3 एस आर पी एफ प्लाटून, 1 सीआरपीएफ कंपनी आणि सशस्त्र पोलीस दलातील 100 पोलीस अमलदार व धारावी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्यासह एकूण 38 वेळा रूट मार्च आणि 28 वेळा कोम्बिंग ऑपरेशनच आयोजन करण्यात आल. ज्यामुळे लोक जास्तीत जास्त घरांमध्ये राहिली. आपलं कर्तव्य बजावत असताना धारावीत 40 पोलीस कर्मचारी आणि 10 एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली.


मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यापासून धारावी मधील कारखाने कसे सुरू होतील या सर्व गोष्टींमध्ये पोलिसांनी वैयक्तिक लक्ष घातलं आणि योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने सरकरच्या आदेशानुसार हे सर्व सुरू केलं. पीपीई किट बनवायचे काम लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलं ज्या मध्ये सुद्धा धारावी पोलीसांनी खूप सहकार्य केल्याचं कारखाना मालक प्राची पवार यांनी सांगितले.


आज धारावीच चित्र बदलेलं आहे, लॉकडाऊन मध्ये धारावीची जी परिस्थिती होती आज ती बदलेली आहे. मुंबई पोलिस दलात सुद्धा कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला,मुंबई पोलिसातील 48 कर्मचारी कोरोनामुळे शहीद झाले,तरीसुद्धा आपल्या कर्तव्यापासून न डगमगता पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले.


Dharavi Corona | धारावीनं कोरोनाची साखळी तोडली, जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक | स्पेशल रिपोर्ट