मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यात आपण सर्व धर्मिय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींसह मुस्लिम बांधवांना केले आहे. नुकत्याच झालेल्या वारीचे आणि येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी सण साजरे करतांना लवकरच नियमावाली जरी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे बकरी ईदला कुर्बानी देण्याससाठी मोठ्या कत्तलखान्यात गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन मटण दुकानांचा पर्याय सुचवला आहे. तसेच यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.



महत्वाचे म्हणजे आजच्या बैठकीत जुलै अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मात्र नियमांचे पालन न झाल्यास हा आलेख चढता राहिला तर कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेवर प्रचंड ताण येईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ज्याप्रमाणे अटी-शर्ती तयार करण्यात आल्या तशाच बकरी ईदसाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाने माझ्या विनंतीखातर आरोग्योत्सव साजरा करण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि एमएमआर रिजनमध्ये झपाट्याने होत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे लक्ष वेधत अत्यंत सण साजरे करताना अत्यंत  काळजीपूर्वक पावले टाकणं गरजेचं असल्याचं मत मांडले.


मात्र काँग्रेस नेते माजी आमदार नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बकरी ईद साजरी करू देण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर मुस्लिम मंत्री व आमदारांची याबाबत काल मंत्रालयात बैठक पार पडली होती. या बैठकीत मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी बकर्यांची कुरबानी देण्यासाठी स्टॉलला मान्यता देण्यात यावी अशा प्रस्तावावर विचार करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र त्यामुळे लोकांची गर्दी होऊ शकते व कोरोनाचा धोका बळावू शकतो यामुळे ऑनलाईन मटण दुकानांच्या प्रस्तावावर काम करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.


बकरी ईद संदर्भात आज आयोजित या ऑनलाईन बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार सर्वश्री अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बकरी ईदलाही परवानगी द्या, नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


Bakri Eid 2020 | बकरी ईद साजरी करण्याच्या परवानगीसाठी काँग्रेस आग्रही