मुंबई : 26/11 च्या दिवशी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात आहे. रविवार 26 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा कॉल आला होता. या कॉलमध्ये मानखुर्द पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या एकता नगरमध्ये 2 ते 3 आतंकवादी आले असून त्यांची भाषा समजत नसल्याचं या कॉलवरुन सांगण्यात आलं होतं. दरम्यान त्यांच काहीतरी सुरु असून त्यांच्याकडे बॅगा देखील आहेत, असं या कॉलवरुन सांगण्यात आलं. दरम्यान हा कॉल आल्यानंतर हा फोन बंद करण्यात आला. किशोर ननावरे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. 


दरम्यान किशोर हा त्यादिवशी दारुच्या नशेत होता. तो दारु पिऊन घरी जात असताना, एका अज्ञात व्यक्ती फोन करण्याकरिता त्याचा फोन मागितला होता, अशी माहिती किशोर याने पोलिसांना दिली. पण त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला फोन लावला हे माहित नसल्याचा दावा देखील यावेळी किशोरने केलाय. त्याचा कॉल झाल्यानंतर त्या व्यक्तीने किशोरला घराजवळ देखील सोडले, असं देखील त्याने पोलिसांसमोर कबूल केलं. त्यामुळे सध्या पोलीस किशोरने केलेल्या सर्व दाव्यांची पडताळणी करत आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जात आहे. 


मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी


काही दिवसांपूर्वी  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थातच टर्मिनल 2 उडवण्याची धमकी देणारा मेल आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर  याप्रकरणात धमकी देणाऱ्या युवकाला एटीएसने त्रिवेंद्रममधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.  आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा मेल आला होता. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. स्फोट टाळण्यासाठी 48 तासांत 10 लाख डॉलरची मागणी या मेलद्वारे करण्यात आली होती. बिटकॉइनमध्ये या युवकाने पैशांची मागणी केली होती. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 385 आणि 505 (1) (बी) अन्वये गुन्हा दाखल केला होता.


हेही वाचा : 


Jalna : अंतरवाली सराटी दगडफेकीतील आरोपी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष, खोटा गुन्हा नोंदवल्याचा आरोप, विजयसिंह पंडित काढणार मोर्चा