मुंबई :  मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police)  बनावट वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळा सारखे दिसणार हुबेहूब संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime)  बनवलं  होतं. ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला  आहे.  मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या  तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी  तगादा  लावला होता. अन्यथा गुन्हा दाखल करण्याची  धमकी दिली होती. तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचं उघड झाले आहे.


सायबर गुन्हे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बनावट वेबसाइट बनवून नेटकऱ्यांची दिशाभूल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी कोणती काळजी घ्याल, याबाबत पोलिसांनी सांगितलं आहे. सायबर फसवणूक टाळायची असल्यास अशा फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखता येणंही गरजेचं आहे. अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.


फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखाल?


1. URL कडे लक्ष द्या. (Pay Close attention to URL) : फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी आधी वेबसाईटच्या URL कडे लक्ष द्या. कोणत्याही नवीन वेबसाईटचा URL नीट तपासून पाहा. प्रत्येक वेबसाईटचा URL वेगळा असतो. फसव्या आणि बनावट वेबसाइटच्या URL मध्ये एखादं अक्षरं किंवा शब्द जास्त असतो. 


2. वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना कनेक्शन तपासा:  वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना HTTP वेबसाईटवर विश्वास ठेऊ नका. सुरक्षिततेची हमी आहे ते तपासून पाहा.


3. ट्रस्ट सील तपासा: अधिकृत वेबसाईटवर ट्रस्ट सील असतो. हा ट्रस्ट सील त्यांची अधिक वेबसाईट अधिकृत वेबसाईट ओळखण्यासाठी आवश्यक अधिकृत आणि बनावट वेबसाईटमधील फरक दाखवतात. हे ट्रस्ट सील मुख्यत: होमपेजवरच असते. त्यामुळे ट्रस्ट सील तपासल्यास तुमची फसवणूक होणार असल्यास ती टाळता येते.


4. वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा: कोणतीही नवीन वेबसाईट वापरताना त्या वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा. यामुळे तुम्हाला वेबसाईट बनावट आहे की अधिकृत हे समजण्यास मदत होईल. प्रमाणपत्राचा तपशील तपासल्याने तुमचा वेबसाईटवरील विश्वास वाढेल.


5. सुरक्षित ब्राऊझिंग: अनेक वेळा तुमचा ब्राऊझर तुम्हाला वेबसाईटच्या धोक्याबाबत इशारा देत असतो. त्याकडे दुर्लक्ष करु नका.


मुंबई पोलिसांनी फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखण्याचे हे मार्ग सांगितले आहेत. याशिवाय सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यात तुम्ही मुंबई पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर तक्रान नोंदवू शकता.