Dr. Babasaheb Ambedkar Indu Mill Meromial Update : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.


जगाला हेवा वाटेल असं इंदु मिल स्मारक : मुख्यमंत्री 


चैत्यभूमीवर जमलेल्या अनुयायांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''लाखो अनुयायी चैत्यभुमी येथे आले आहेत. शासन आपल्या सर्वांचं आहे. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी करण्याचं आणि समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. या सरकारसाठी सर्वोच्च महत्वाची बाब म्हणजे इंदु मिल स्मारक लवकर पूर्ण करणे आहे.'' जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं की, ''डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम आहे. भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मुलाचा वाटा आहे. मला या गोष्टीचा समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधान मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. आज त्या ठिकाणी भव्य स्मारकाचा निर्माण होत आहे आणि मला अपेक्षा आहे की, आपला पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे.'' त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.


डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया


फडणवीसांनी पुढे म्हटलं की, ''भारत सध्या वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे, लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होईत. खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाने या देशांमध्ये एक अशी अर्थव्यवस्था उभी केली. ज्यामुळे बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था तयार झाली. हे सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे शक्य झालं आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील मला धर्मग्रंथापेक्षा देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान अधिक महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समता आणि बंधुता हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले तत्व आहे, या तत्त्वाच्या आधारावर भारताचे संविधान तयार केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय तिच्या मार्गावर चालून देखील जगामध्ये एक आपली आगळीवेगळी ओळख तयार झाली आहे.''