मुंबई : मुंबईतील ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. सुरज धर्मा जाधव असं या आरोपीचे नाव असून तो सीएसटी रोड, वाकोला परिसरात राहतो. दारू पिऊन त्याने पोलिस मुख्यालयामध्ये फोन केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. 


गुरूवारी सायंकाळी सुरजने मद्यप्राशन करून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन केला. पंचतारांकित हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या फोननंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता या ठिकाणी कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. 


त्यानंतर पोलिसांनी हा फोन करणाऱ्या व्यक्तीचा तपास घेतला. हा फोन वाकोला परिसरात राहणाऱ्या सुरज जाधवने केला असल्याचं तपासातून स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी 505(2), 505(1) (ब),182 भादवी कलमांसह 85(1) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


तीन बॉम्ब हल्ल्यांची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल 


ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याच्या धमकीच्या प्रकरणी आता पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 505 (1)(B), 170, 182 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा फोन 18 ऑक्टोबर रोजी पोलिस हेल्पलाईनवर आला होता. फोन करणाऱ्या अज्ञात इसमानं अंधेरी इन्फिनिटी मॉल, जुहू पीव्हीआर आणि सहारा हॉटेलवर बॉम्ब हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली होती. पण हा फोन नेमका कोणी केला होता त्याची अद्याप माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या धमकीनंतर अंधेरी इन्फिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जुहू पीव्हीआर (Juhu PVR Mall)आणि सहारा हॉटेलची (Sahara Hotel) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी CISF आणि BDDS च्या टीमने तपास केला.